पुणेकरांची रोखठोक भूमिका
त्यामुळे ४९ टक्के पुणेकरांनी शहरातील पर्यावरण ‘वाईट’ आणि ‘खूप वाईट’ पातळीवर पोहोचल्याची भूमिका रोखठोक मांडली आहे. पर्यावरणस्नेही उपक्रमांना आमचे सहकार्यच असेल; पण यासाठी महापालिकेने आधी वृक्षसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, जलस्रोत शुद्धीकरण आणि वाहतूक नियंत्रणावर तातडीने कृती करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तर ४१.८ % नागरिकांची पर्यावरणाला ‘मध्यम’ श्रेणी
पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालाच्या निमित्ताने घेतलेल्या नागरिकांच्या सर्वेक्षणातून शहराच्या पर्यावरणाबाबत तीव्र असमाधान समोर आले आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सोळाशे नागरिकांनी भाग घेतला होता. त्यापैकी केवळ ९.६ टक्के नागरिकांनी पुण्याचे पर्यावरण ‘चांगले’ किंवा ‘खूप चांगले’ असल्याचे म्हटले आहे, तर ४१.८ टक्के नागरिकांनी पर्यावरणाला ‘मध्यम’ श्रेणी दिली. शहरातील वाढत्या पर्यावरणीय समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलतानाच, त्यांनी महापालिकेकडून असलेल्या अपेक्षा आणि समस्येनुसार प्राधान्यक्रमही सांगितला आहे.
सर्वेक्षणात मागण्या ठळकपणे मांडल्या
नागरिकांच्या मते पुढील पाच वर्षांत महापालिकेने वृक्षारोपण आणि शहरी वनांवर सर्वाधिक लक्ष द्यावे. कचरा व्यवस्थापनात सुधारणा, सार्वजनिक वाहतूक, हवा प्रदूषण नियंत्रण, नदी पुनरुज्जीवन आणि चांगले पदपथ- सायकल मार्ग सुधारावेत, या मागण्या सर्वेक्षणात ठळकपणे मांडल्या आहेत.
‘सार्वजनिक वाहतूक स्वीकारू’
सर्वेक्षणात वाहतूक व्यवस्था सुधारणेबाबत नागरिकांची तयारीही स्पष्ट आहे. सार्वजनिक वाहतूक जलद, विश्वासार्ह आणि कार्यक्षम झाल्यास ९३.९ टक्के नागरिक खासगी वाहनांचा वापर कमी करण्यास तयार आहेत. तीन किलोमीटरपेक्षा कमीअंतरासाठी ८५टक्क्यांहून अधिक नागरिक किमान कधी तरी पायी किंवा सायकलने जाण्यास तयार आहेत.
लँडस्केपिंगसाठी पुनर्वापर करण्यास ९०.४ % नागरिकांचा पाठिंबा
त्यासाठी झाडांची सावली, अखंड पदपथ, सुरक्षित रस्ते आणि वाहतूककोंडी कमी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कचरा व्यवस्थापनातही नागरिक सहकार्य करण्यास तयार आहेत. ७६.५ टक्के नागरिक प्रोत्साहन मिळाल्यास प्लास्टिक बाटल्या आणि पॅकेजिंग परत देण्यास तयार आहेत, तर ५७.७ टक्के नागरिक घरच्या घरी कंपोस्टिंग करण्यास तयार आहेत. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बागकाम, फ्लशिंग व लँडस्केपिंगसाठी पुनर्वापर करण्यास ९०.४ टक्के नागरिकांनी पाठिंबा दिला.
सर्वेशनातील निष्कर्ष
. पुण्यातील पर्यावरणाला खराब किंवा अतिशय खराब म्हणणारे ४९%
.सर्वोच्च पर्यावरणीय प्राधान्य शहरी वनीकरण देणारे ३५ %
. खासगी वाहनांचा वापर कमी करण्यास तयार असलेले नागरिक ९४ %
.प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापरास पाठिंबा देणारे पुणेकर ९०%
.वीकएंडला व्यावसायिक रस्ते -पादचाऱ्यांसाठी राखीव ठेवणारे नागरिक ७० %
. पायाभूत सुविधा व सेवांचा अभाव असल्याचे म्हणणारे नागरिक ६३ %

