Headlines

पावसाचा जोर वाढणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोकण ते विदर्भ कुठे किती बरसणार? IMDचा अंदाज समोर| Maharashtra Times


Weather Alert: राज्यात पावसाचं पुनरागमन झालं असून जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे. महामुंबई परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

महाराष्ट्र हवामानाच्या बातम्या
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवामान विभागाने २ जुलैपासून कोकण विभागात आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आता पावसाळी वारे अधिक सक्रिय होताना दिसत असून, सिंधुदुर्गात १ आणि २ जुलै; तर रत्नागिरी, रायगडला २ जुलै रोजी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई तसेच रायगड, रत्नागिरी येथे आज, सोमवारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

महामुंबई परिसरामध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींचा इशारा दिलेला असला तरी अजूनही पावसाची एखादी सर येऊन दिवसभर उकाड्याचा ताप जाणवत आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईचे कमाल तापमान ३० अंशांखाली आले होते, मात्र २४ जूननंतर पुन्हा कमाल तापमानाचा पारा चढा असल्याची नोंद होत आहे. रविवारी जारी करण्यात आलेल्या पूर्वानुमानानुसार गुरुवारनंतर दक्षिण कोकणात पावसाचा ऑरेंज ॲलर्ट दिला आहे. तसेच, महामुंबई परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra TimesMaharashtra Rain : राज्यात 1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव डख यांचा अंदाज

सोमवारी आणि मंगळवारी काय स्थिती असेल?

सिंधुदुर्गात १ आणि २ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात २ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकेल. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये २ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये सोमवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकेल. रायगड, रत्नागिरी येथेही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, सिंधुदुर्ग येथे मात्र सोमवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

कोसळधारेने कांचनगंगा नदीला पूर

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी दमदार पाऊस पडल्याने सर्वत्र जलमय वातावरण तयार झाले. डोणगावच्या कांचनगंगा नदीला पूर आल्याने मुंबई ते नागपूर राज्य महामार्ग रविवारी पहाटे साडेतीन वाजतापासून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत बंद झाला होता. यामुळे वाहनधारक व प्रवाशांना ताटकळत पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली.

पाऊस

मराठवाड्यात पावसाला सुरुवात

मराठवाड्यात पाऊस सक्रिय झाला असून, गेल्या २४ तासांत विभागात सरासरी ८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या दोन जुलैपर्यंत लातूर जिल्ह्याचा अपवाद वगळता सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवारी ताशी ४० तस ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

नाशिकमध्ये पावसाची हजेरी

सलग पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारनंतर नाशिकमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत अवघा एक मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. काही भागांत जोरदार सरी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी हलका पाऊस झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. जिल्ह्यात सोमवार (दि. २९) आणि मंगळवारी (दि. ३०) यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सोलापूर शहर, जिल्ह्यातपावसाची जोरदार हजेरी

सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवारी दुपारनंतर सायंकाळपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. सोलापूर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले; तर काही भागातील परिसर जलमय झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले.

विदर्भात पावसाचा जोर वाढणार

संपूर्ण विदर्भातलही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून अमरावती जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची दमदार हेजरी

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा घाटमाथा परिसर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये २९ जून रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यासह घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढेल. तसेच, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सातारा, पुणे आणि सांगली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा