Nashik News: नाशिकमध्ये भूकंपप्रवण भागात निरीक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील भूकंप मालिकेचा अभ्यास करण्यात येणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाणार
या पार्श्वभूमीवर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे तज्ज्ञ पथक उद्या, बुधवारी (दि. ५) नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे. भूकंपप्रवण भागात अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाणार असून, या माध्यमातून मिळणारी माहिती थेट दिल्लीतील नियंत्रण केंद्रापर्यंत पोहोचणार आहे.
दिंडोरी, सुरगाणा, कळवण, पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सौम्य भूकंपांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये धास्ती कायम आहे.
Nagpur News:संशोधनाचा चमत्कार!रात्रीदेखील सोलर पॅनलद्वारे होणार ऊर्जानिर्मिती
भूकंपाचा केंद्रबिंदू दिंडोरी
गेल्या सात दिवसांत जिल्ह्यात १२ भूकंपांचे धक्के नोंदविण्यात आले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू दिंडोरी येथे भूगर्भात सात किलोमीटर खोलीवर होता. आतापर्यंत बहुतांश धक्क्यांची तीव्रता दोन ते तीन रिश्टर स्केलदरम्यान राहिली असून, सर्वाधिक३.९ रिश्टर स्केलचा धक्का नोंदविण्यात आला आहे.
भूकंप नोंदणी यंत्रे बसविण्यात येणार
या पार्श्वभूमीवर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे तज्ज्ञ पथक बुधवारी (दि. ५) नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे. हे पथक भूकंपप्रवण भागाची पाहणी करून भूगर्भीय स्थिती, भूकंपांच्या मालिकेमागील कारणे, भूगर्भातील हालचाली आणि आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करणार आहे. प्राथमिक टप्प्यात कळवणसह भूकंपप्रवण परिसरात चोवीस तास कार्यरत राहणारी चार तात्पुरती भूकंप नोंदणी यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
माहिती थेट दिल्लीतील नियंत्रण केंद्रापर्यंत पोहोचणार
या यंत्रांच्या माध्यमातून प्रत्येक सूक्ष्म धक्क्याचीनोंद घेतली जाणार असून, त्याची माहिती थेट दिल्लीतील नियंत्रण केंद्रापर्यंत पोहोचणार आहे.
वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक अभ्यासानंतर या परिसरात कायमस्वरूपी भूकंप निरीक्षण यंत्र बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या यंत्रामुळे जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींची सातत्याने नोंद घेणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि स्थानिक प्रशासनाला अधिक अचूक तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. भविष्यात भूकंपाच्या धक्क्यांबाबतची माहिती स्थानिक पातळीवर अधिक वेगाने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

