Nashik-Pune Semi-Highspeed Railway: नाशिक-पुणे सेमा हायस्पीज रेल्वे मार्गात केलेल्या बदलांनंतर सरळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, सिन्नर: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित सरळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला जनसंघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – खेड – चाकण या मार्गालाच प्राधान्य देण्याची भूमिका सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ठामपणे मांडली. दरम्यान, २९ जून रोजी गोंदे फाटा येथे प्रस्तावित रस्ता रोको आंदोलनाबाबतचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सरळ मार्गाची मागणी
बुधवारी (दि. २४) सिन्नर तहसील कार्यालयात प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीपकुमार बोरसे तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक भरत जाधव यांच्या उपस्थितीत रेल्वे कृती समितीची बैठक झाली. प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असली तरी समितीने सरळ मार्गाच्या मागणीवर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक झाली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यायी मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे नुकसान होणार असल्याचे सांगत मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली.
बैठकीस कृती समितीचे बबन वाजे, हरिभाऊ तांबे, भाऊसाहेब शिंदे, प्रा. राजाराम मुंगसे, मुकेश देशमुख, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. सर्वांनी रेल्वेच्या सरळ मार्गाचे औद्योगिक, सामाजिक, आर्थिक आणि प्रादेशिक विकासासाठीचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रेल्वे विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी तसेच महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा करून कृती समितीची भूमिका शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार रेल्वे कृती समितीने व्यक्त केला.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. डॉ. कोल्हे यांनी आगामी संसदीय अधिवेशनात महाराष्ट्रातील संबंधित खासदार एकत्रितपणे हा मुद्दा संसदेत मांडतील, तसेच रेल्वे मार्गाच्या तांत्रिक, आर्थिक आणि लोकहिताच्या बाबी केंद्र सरकारसमोर मांडल्या जातील, असे आश्वासन दिले. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास जनआंदोलन उभारण्याचाही इशारा त्यांनी दिला. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनीही या विषयावर संबंधित १४ आमदारांना एकत्र आणून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरच रस्ता रोको आंदोलनाबाबत अंतिम भूमिका जाहीर करण्याचा निर्णय झाला.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा