Headlines

नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई:नागपूर अन् वर्ध्यातील 5 घरफोड्या उघड, 15.63 लाखांचा मुद्देमाल जप्त




गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत चार प्रौढ आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे 15 लाख 63 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण उर्फ मोसा अशोक ठाकरे (23), गौरव सुरेश खडसे (20), क्रिश रामचरित्र जयस्वाल (19), अमन बिसन देव सहानी (23) अशी प्रौढ आरोपींची नावे आहेत. याशिवाय दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हे आरोपी नागपूर शहरातील कोतवाली, कन्हान, कळमना आणि यशोधरानगर परिसरातील रहिवासी आहेत. आरोपींकडून लकडगंज आणि अजनी पोलिस ठाण्यांतील प्रत्येकी एक, तसेच वर्धा शहर, रामनगर व सेलू पोलिस ठाण्यांतील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये चोरी व घरफोडीशी संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींकडून पाच किलो चांदीचे दागिने व चांदीची भांडी, चोरीचे मोबाइल फोन व हेडफोन, 2,890 रुपये रोख रक्कम, तसेच गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टिव्हा आणि रॉयल एनफिल्ड दुचाकी जप्त केली आहे. याव्यतिरिक्त, आरोपींचे पाच मोबाइल फोनही ताब्यात घेण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये चांदीच्या वस्तूंची किंमत सुमारे 11 लाख 80 हजार रुपये, अ‍ॅक्टिव्हाची 80 हजार रुपये, रॉयल एनफिल्डची दोन लाख रुपये आणि आरोपींच्या पाच मोबाइल फोनची किंमत 1 लाख 75 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह वर्धा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या सायबर पथकाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत