Headlines

धरणीकंपामुळे घरांच्या थरारल्या विटा;नागरिकांत भितीचे वातावरण


Nashik News: नाशिक मध्ये सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ,कळवण दिंडोरी या भागात नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असतात. पण आता तर भूकंपाच्या धक्क्याने अवघे नाशिक हादरून गेलेय.शनिवारी रात्री १० वाजून १ मिनिटाच्या सुमारास ४.३ रिश्टल स्केलचा तीव्र धक्का बसला. याचा परिणाम नागरिकांच्या घरावर झाला. घरांना तडे गेलेत.

नाशिक भूकंप
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी ,नाशिक :पंधरा दिवसांपासून सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण व दिंडोरी या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणवणारे भूकंपाचे धक्के आता शहराच्याही उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. शनिवारी (दि. ८) रात्री १० वाजून १ मिनिटाच्या सुमारास ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसल्याने अवघे नाशिक शहर हादरून गेले. गंगापूररोड, महात्मानगर, जेलरोड, उपनगर, पंचवटी, म्हसरूळ, सिडको आणि आडगाव या परिसरांमध्ये सुमारे १० ते २२ सेकंदांपर्यंत जमीन थरथरण्यासोबतच इमारतींनाही हादरे बसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.

भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल

अचानक आलेल्या या धक्क्यामुळे शहरवासीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अनेक नागरिक तत्काळ इमारतींमधून खाली उतरून मोकळ्या जागेत जमा झाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती.

भूकंपाचा केंद्रबिंदू

दिंडोरी तालुक्यातील भनवड-शिंदपाडा परिसरात जमिनीपासून सुमारे पाच किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. केंद्रबिंदू शहरापासून तुलनेने जवळ असल्याने त्याचे हादरे नाशिक शहराच्या अनेक भागांत स्पष्टपणे जाणवले. रात्रीची शांतता काही सेकंदांत भंगली आणि अनेक ठिकाणी इमारती हादरल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.

नागरिकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण

आतापर्यंत सुरगाणा, पेठ, कळवण आणि दिंडोरी या ग्रामीण भागांपुरतेच भूकंपाचे धक्के मर्यादित असल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरात त्याची प्रत्यक्ष जाणीव फारशी होत नव्हती. मात्र, शनिवारी रात्रीचा धक्का थेट शहरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीची वेळ असल्याने अनेकजण घरात झोपण्याच्या तयारीत होते. हादरे जाणवताच काहींनी घराबाहेर धाव घेतली. सोसायट्यांच्या आवारात, रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांमध्ये काही काळ नागरिकांची गर्दी झाली.

भूकंपमालिकेची शहराच्या उंबरठ्यावर धडक

नेमके काय झाले, पुन्हा धक्का येईल का, घरात थांबणे सुरक्षित आहे का, अशा चर्चांना उधाण आले. रात्री उशिरापर्यंत अनेक नागरिक भीतीपोटी घराबाहेरच थांबून होते. ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या भूकंपमालिकेने शहराच्या उंबरठ्यावर धडक दिल्याने नाशिककरांच्या चिंतेतही भर पडली.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News: सुलभ दंतोपचार झाले अद्ययावत ;ओपीडीसह मॉड्युलर ओटीचे उद्घाटन

म्हणून होतात सूक्ष्म कंपने

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) निरीक्षणानुसार, जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्री पट्ट्यात सूक्ष्म ‘फॉल्ट लाइन्स’ आहेत. मुसळधार पावसाचे पाणी भूगर्भात खोलवर झिरपल्याने फॉल्टवरील घर्षण कमी होते. त्यामुळे खडकांमध्ये आधीपासून साचलेला ताण अचानक मुक्त होऊन सूक्ष्म कंपने होतात.

Maharashtra TimesPrabalgad : प्रबळगडावर 17 वर्षीय तरुण-तरुणी वाट चुकले, पावसाळ्यात नवख्या पर्यटकांची तारांबळ, पोलीस-स्थानिकांमुळे डोंगरावरुन सुरक्षित खाली

भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता

हे हादरे सुमारे पाच किलोमीटर खोलीवर होत असल्याने त्यांची कंपने नागरिकांना तुलनेने अधिक तीव्रतेने जाणवतात. फॉल्टलाइन सक्रिय असलेल्या भागात खडकांवरील ताण निर्माण होण्याची प्रक्रिया सुरूच राहू शकते. त्यामुळे एका धक्क्यानंतर भूगर्भातील हालचाली पूर्णपणे थांबतातच असे नाही. फॉल्ट लाइनच्या परिसरातील हालचालींमुळे त्यानंतरही छोटे धक्के जाणवू शकतात. त्यामुळे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात भविष्यातही अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा