![]()
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव येथे सहा वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडात बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याव्यतिरिक्त, पोलिसांना खोटी ओळख सांगून माहिती लपविल्याप्रकरणी त्याला कलम १७६ व १७७ अंतर्गत प्रत्येकी सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बारडे यांनी २ जुलै रोजी हा निकाल दिला. ३० जुलै २०२० रोजी प्रमोद पवार याने आपली पत्नी हाशीबाई उर्फ मनीषा जाधव आणि गुलचंद उर्फ दीपक वाघमारे यांची काठी व कोयत्याने हल्ला करून हत्या केल्याचा आरोप होता. घटनेनंतर आरोपीने स्वतःचे नाव ‘मंगेश जाधव’ असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासानंतर त्याची खरी ओळख प्रमोद उर्फ पप्पू पवार अशी समोर आली. या खटल्यात सर्वात महत्त्वाची ठरली ती त्यावेळी नऊ वर्षांची असलेल्या बालसाक्षीदाराची प्रत्यक्षदर्शी साक्ष. न्यायालयाने तिच्या साक्षीतील किरकोळ विसंगती नैसर्गिक मानत, मुख्य घटनाक्रम सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह असल्याचे नमूद केले. बालसाक्षीदाराला शिकवून साक्ष देण्यास प्रवृत्त केल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याने तिच्या साक्षीवर विश्वास ठेवण्यात आला. वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील कोयता व काठी, रक्ताचे नमुने, पंचनामे, मृतदेहावरील जखमा आणि रासायनिक विश्लेषण अहवाल यामुळे अभियोजन पक्षाच्या कथनाला भक्कम आधार मिळाला. आरोपीच्या कपड्यांवर आणि जप्त केलेल्या शस्त्रांवर मृतांचे रक्त आढळल्याने परिस्थितीजन्य पुरावेही अभियोजन पक्षाच्या बाजूने गेले. बचाव पक्षाने आरोपीची ओळख, एफआयआरमधील नावातील तफावत आणि स्वतंत्र साक्षीदार नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी साक्ष, तपासातील कागदपत्रे आणि वैद्यकीय पुरावे एकमेकांना पूरक असल्याने न्यायालयाने हे आक्षेप फेटाळले. आरोपीने जाणीवपूर्वक खोटी ओळख सांगून तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही न्यायालयाने नमूद केले. या निकालामुळे बालसाक्षीदाराची विश्वासार्ह साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि वैज्ञानिक तपास यांची साखळी भक्कम असेल तर गंभीर गुन्ह्यांमध्येही दोषारोप सिद्ध होऊ शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Source link
दौंड दुहेरी हत्याकांड: आरोपीला जन्मठेप, बालसाक्षीची साक्ष महत्त्वाची:सहा वर्षांपूर्वीच्या खुटबाव घटनेत बारामती न्यायालयाने निकाल दिला
