देवगड / प्रतिनिधी : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., देवगड यांच्यावतीने जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम्’ समूहगीत गायन व समूह नृत्य स्पर्धा २०२६ ला देवगड तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत समूहगीत गायन स्पर्धेत अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल यांनी द्वितीय क्रमांक, तर शेठ म. ग. हायस्कूल, देवगड आणि एस. बी. राणे हायस्कूल, नारिंगे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला. समूह नृत्य स्पर्धेत उमा मिलिंद पवार हायस्कूल, देवगड (देवगड इंग्लिश मीडियम स्कूल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर सर्वोत्कृष्ट शाळेचा मान श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल यांना मिळाला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अॅड. अजित गोगटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने ‘वंदे मातरम्’ हा उपक्रम प्रत्येक तालुकास्तरावर राबवावा, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळते आणि त्यांचा व्यासपीठावरील आत्मविश्वास वाढतो. ‘वंदे मातरम्’सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत होण्यास मदत होते. अशा उपक्रमांमध्ये शाळांचा सहभाग आणखी वाढला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
स्पर्धेत देवगड तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत आणि नृत्याचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्राभिमान आणि संस्कारांचे दर्शन घडले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
समूहगीत गायन स्पर्धेचे परीक्षण दत्तात्रय किरकिरे, तर नृत्य स्पर्धेचे परीक्षण सौ. प्रिया लाड यांनी केले. विजेत्या शाळांना तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या मार्केटिंग मॅनेजर सौ. साक्षी मयेकर, मयूर पिंगुळकर, देवगड शाखा व्यवस्थापक मंगेश तळवडेकर, सावंतवाडी कार्यालयाच्या अंकिता पेडणेकर, सीएसआर सहाय्यक गौरी जुवेकर, सहाय्यक शाखा व्यवस्थापक प्रतीक वेसणेकर, धनश्री पावसकर, अटेंडंट सुनील रासम, साहील वाळवे, हर्षद राणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर पिंगुळकर व धनश्री पावसकर यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक संस्कार रुजविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी, शिक्षक, परीक्षक, शाळांचे प्रतिनिधी आणि लोकमान्य सोसायटीच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
