Headlines

दगडूशेठ मंदिर परिसरातील पोलिस कार्यालये हलवण्याची मागणी:'अ' दर्जा मिळाल्याने भाविकांच्या सोयीसाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र




आमदार हेमंत रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कार्यालये पर्यायी जागेत हलवण्याची मागणी केली आहे. मंदिर ट्रस्टला शासनाकडून तीर्थस्थळ ‘अ’ दर्जा मिळाल्याने आणि दररोज सुमारे ५० हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढती गर्दी व वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या मागणीसंदर्भात आमदार रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र दिले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक अभिप्राय दिला असून, काही अटी नमूद केल्या आहेत. सध्या मंदिराकडे सहा गुंठे जागा उपलब्ध असून, आणखी तीन गुंठे जागा मिळण्याची शक्यता आहे. या उपलब्ध जागेचा विकासात्मक आराखडा तयार केला जाणार आहे. पोलिस ठाण्यांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून नवीन इमारती बांधल्यानंतरच सध्याची कार्यालये स्थलांतरित केली जातील, असे रासने यांनी स्पष्ट केले. पोलिस कार्यालये हलवल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या जागेचा उपयोग भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, रांगा, प्रतीक्षास्थळे आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. रासने यांनी मुख्यमंत्र्यांकडे शनिवारवाडा ते सारसबाग परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करून या भागाचा नियोजनबद्ध विकास करण्याची मागणीही केली आहे. या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन केल्यास हा परिसर जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो. पुण्याचे महत्व जागतिक पटलावर पुन्हा आधोरोखित होऊ शकते. वाढती वाहतूक आणि भाविकांची गर्दी पाहता या भागात भूमिगत रस्ते उभारण्याची गरज असल्याचेही आमदार रासने यांनी नमूद केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत