Headlines

दगडूशेठ ट्रस्टकडून पालखीसाठी रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर रवाना:संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत 37 व्या वर्षाचा उपक्रम




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या सेवेकरिता तीन सुसज्ज रुग्णवाहिका पुण्यातून रवाना करण्यात आल्या आहेत. यासोबतच पिण्याच्या पाण्याचे टँकरही पाठवण्यात आले आहेत. या उपक्रमाचे हे ३७वे वर्ष आहे. ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. पालखी सोहळ्याच्या समारोपापर्यंत वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, औषधे आणि आरोग्यविषयक सेवा विनामूल्य पुरवण्यात येणार आहे. गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी सांगितले की, कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना त्वरित आरोग्य सेवा मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. सासवड मार्गे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत, लोणीमार्गे जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका असणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी वैद्यकीय संस्थांतर्फे पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास असतो, तेथे फिरता दवाखाना देखील चालविला जातो. यामध्ये त्वचा रोग, कान-नाक-घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब आणि शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येतात. तसेच औषधोपचारही विनामूल्य दिला जातो. दरवर्षी हजारो वारकरी या आरोग्य सेवेचा लाभ घेतात.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत