Headlines

डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला वेग, पश्चिम घाटातून जाणार मार्ग; आदिवासी व ग्रामीण भागांचा विकास| Maharashtra Times


Palghar-Nashik Rail Line: पालघर जिल्ह्यातील डहाणू ते नाशिकपर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी गेली अनेक वर्ष मागणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला वेग मिळत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

dahanu-nashik railway
म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर-नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी पालघर, नाशिक तसेच विक्रमगड, जव्हार, मोखाडा भागातील नागरिक गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत आहेत. आता या रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. या प्रकल्पामुळे पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

40 वर्षांपूर्वी प्रकल्पाची मागणी

जव्हारचे तत्कालीन खासदार राजे मुकणे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग उभारण्याची मागणी केली होती. मात्र, हा मार्ग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याचे सांगत रेल्वे विभागाने तो प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. त्यानंतर डहाणूचे खासदार चिंतामण वनगा यांनीही डहाणू-नाशिक रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला; परंतु तो मार्ग किफायतशीर नसल्याचे कारण देत रेल्वे विभागाने पुन्हा तो प्रस्ताव पुढे नेला नव्हता. त्यानंतर पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनीही या प्रश्नासाठी प्रयत्न केले; मात्र तो मार्ग व्यावसायिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचे सांगत प्रस्ताव पुन्हा धूळखात पडला.

Maharashtra TimesWestern Railway: ‘मिनी मॉल’, ‘कॅफे’सारख्या सुविधा रेल्वे स्थानकावरच! पश्चिम रेल्वेचं महसूल दुप्पट करण्याचं उद्दिष्ट; कसा होईल फायदा?

दरम्यान पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू ठेवला. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती दिली.

मालवाहतुकीसाठी मार्ग उपयुक्त

खासदार डॉ. सवरा यांनी, कल्याण-मुरबाड या शहरी भागातील रेल्वे मार्गाचे काम सुरू केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. तसेच बहुतांश आदिवासी आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प आदिवासी व ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा असल्याने सर्वेक्षण कधी पूर्ण होणार आणि प्रकल्पाला मंजुरी कधी मिळणार, असा प्रश्नही त्यांनी संसदेत उपस्थित केला. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ वाढवण बंदर उभारण्याचे काम प्रस्तावित असल्याने या बंदरासाठी देश-विदेशातून येणारा कच्चा व तयार माल वाहतुकीसाठी डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Maharashtra TimesNavi Mumbai Metro: तळोजा-खांदेश्वर मेट्रोसाठी 5 हजार कोटींची तरतूद, नवी मुंबईत दुसरी मार्गिका; अनेक वर्षांनंतर मंजुरी

प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा

डहाणू ते नाशिक या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. हा मार्ग पश्चिम घाटातून जाणार असल्याने हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे. पश्चिम घाटातील भौगोलिक परिस्थिती आणित्यातील आव्हाने लक्षात घेता अनेक तांत्रिक बाबींचा या प्रकल्पात समावेश आहे. मात्र या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला दिले.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा