बांदा/ प्रतिनिधी : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून इन्सुली येथे डेंग्यूचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर सुरुवातीला गोव्यातील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्याला आता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
इन्सुली येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य सदा राणे यांनी इन्सुली उपकेंद्राला तातडीने भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी अमित भाग्यवंत आणि आरोग्यसेवक दिग्विजय जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी आरोग्यसेविका दीपा देसाई उपस्थित होत्या.
चर्चेदरम्यान सदा राणे यांनी आरोग्य यंत्रणेला परिसरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यासह फॉगिंग आणि औषध फवारणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, “आरोग्य विभागाला अथवा नागरिकांना यासंदर्भात काहीही मदत लागल्यास मला त्वरित सांगा,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र सतर्क झाले असून परिसरात स्वच्छता आणि औषध फवारणीवर भर दिला जात आहे. नागरिकांनी घराच्या आसपास पाणी साचू न देणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
