Headlines

आप्पेपात्रात बनवा गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानकटाई,कोणालाही अगदी सहज बनवता येईल इतकी सोपी रेसिपी – how to make nankhatai recipe at home recipe sharded by kavita recipe in marathi


आप्पेपात्राच्या मदतीने ओव्हनशिवाय नानकटाई कशी बनवायची, याची अगदी सोपी पद्धत या रेसिपीमध्ये सांगितली आहे.ही सोपी आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाची नानकटाई रेसिपी कविताज रेसिपी यांनी शेअर केली आहे.

Wheat Flour Nankhatai
फोटो सौजन्य :- @Kavita’s Recipe in Marathi)
नानकटाई म्हटलं की बाहेरून हलकीशी कुरकुरीत आणि आतून मऊसर, तोंडात टाकताच विरघळणारी तिची चव आठवते. बाजारातून नानकटाई आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ती तयार करता येते. विशेष म्हणजे नानकटाई बनवण्यासाठी नेहमी मैदाच वापरावा लागतो असे नाही. गव्हाच्या पिठापासूनही मस्त हलकी, खुसखुशीत आणि स्वादिष्ट नानकटाई तयार करता येते.

आजची ही रेसिपी आणखी खास आहे कारण नानकटाई बनवण्यासाठी ओव्हनची गरज नाही. नॉनस्टिक आप्पेपात्राच्या मदतीने अगदी सहज नानकटाई तयार करता येते. पहिल्यांदाच नानकटाई बनवणाऱ्यांनाही ही पद्धत नक्कीच सोपी वाटेल. योग्य प्रमाणात साहित्य घेणे, तूप आणि साखर व्यवस्थित फेटणे, पीठ जास्त न मळणे आणि अगदी मंद आचेवर नानकटाई बेक करणे या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर नानकटाई सुंदर रंगाची, हलकी आणि खुसखुशीत तयार होते.

या नानकटाईची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये मैदा किंवा डालडा वापरण्याची आवश्यकता नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या गव्हाचे पीठ, बेसन, बारीक रवा, साजूक तूप आणि पिठीसाखर यांसारख्या साध्या साहित्यापासून ही रेसिपी बनवता येते. त्यामुळे कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट घरगुती नानकटाई तयार करण्यासाठी ही पद्धत नक्की करून पाहण्यासारखी आहे. (फोटो सौजन्य :- @Kavita’s Recipe in Marathi)

नानकटाईसाठी लागणारे साहित्य

नानकटाईसाठी लागणारे साहित्य

या रेसिपीमध्ये वापरले जाणारे प्रमाण अगदी सोपे आहे. मोजमापासाठी एकच वाटी वापरली तरी चालते.

१ कप गव्हाचे पीठ
½ कप बेसन
¼ कप बारीक रवा
½ चमचा बेकिंग सोडा
½ चमचा वेलची पावडर
½ कप साजूक तूप
¾ कप पिठीसाखर
सजावटीसाठी बारीक चिरलेला पिस्ता किंवा बदाम
गरज भासल्यास १–२ चमचे अतिरिक्त तूप
इथे रवा शक्यतो बारीक म्हणजे झिरो नंबरचा वापरावा. जाड रवा वापरल्यास नानकटाई खाताना कचकच जाणवू शकते.

पीठ चाळणे महत्त्वाचे

पीठ चाळणे महत्त्वाचे

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात चाळणी ठेवून त्यामध्ये गव्हाचे पीठ, बेसन आणि बारीक रवा घ्या. त्यात बेकिंग सोडा आणि वेलची पावडरही घाला. हे सर्व साहित्य एकत्र चाळून घ्या.पीठ चाळल्यामुळे त्यामध्ये हवा मिसळते आणि मिश्रण हलके होते. त्यामुळे नानकटाई अधिक हलकी आणि खुसखुशीत होण्यास मदत होते. चाळणीत शेवटी काही जाडसर कण उरले तर ते वापरू नयेत.चाळलेले सर्व साहित्य चमच्याने एकदा व्यवस्थित मिसळून बाजूला ठेवा.

तूप आणि पिठीसाखर फेटण्याची योग्य पद्धत

तूप आणि पिठीसाखर फेटण्याची योग्य पद्धत

आता दुसऱ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ½ कप साजूक तूप घ्या. मात्र तूप वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तूप खूप घट्ट किंवा पूर्णपणे वितळलेले नसावे. ते रवाळ, मऊसर स्वरूपाचे असावे.त्यामध्ये ¾ कप पिठीसाखर घाला. जर तुम्हाला नानकटाई थोडी जास्त गोड आवडत असेल, तर १ कप पिठीसाखर वापरू शकता.आता तूप आणि पिठीसाखर व्हिस्कच्या मदतीने साधारण २ ते ३ मिनिटे फेटून घ्या. हे मिश्रण हलके, फिकट रंगाचे आणि थोडे फ्लफी झाले पाहिजे. तुमच्याकडे व्हिस्क नसेल तर बीटरचाही वापर करू शकता.

मिश्रण व्यवस्थित फेटले आहे हे कसे ओळखाल?

मिश्रण व्यवस्थित फेटले आहे हे कसे ओळखाल?

यासाठी एक सोपी युक्ती आहे. एका छोट्या वाटीत थोडे पाणी घ्या. फेटलेल्या तूप-साखरेच्या मिश्रणाचा एक-दोन थेंब त्यात सोडा. हे मिश्रण पाण्यावर तरंगले तर ते व्यवस्थित फेटले गेले आहे असे समजावे.ही छोटीशी स्टेप नानकटाई हलकी आणि खुसखुशीत होण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

नानकटाईचे पीठ तयार करा

नानकटाईचे पीठ तयार करा

आता आधी चाळून ठेवलेले पीठ तूप आणि साखरेच्या मिश्रणात घाला. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ कणकेप्रमाणे मळायचे नाही.स्पॅचुला किंवा चमच्याच्या मदतीने पीठ हलक्या हाताने एकत्र करत राहा. मिश्रण एकजीव झाले की हाताने फक्त हलक्या हाताने त्याचा गोळा तयार करा.पीठ जास्त मळल्यास नानकटाईचा पोत बदलू शकतो. त्यामुळे हाताची जास्त ताकद वापरण्याची गरज नाही.
दिलेल्या प्रमाणानुसार साधारण योग्य गोळा तयार होतो. तरीही पीठ खूप कोरडे वाटत असेल आणि गोळा तयार होत नसेल, तर फक्त १–२ चमचे अतिरिक्त तूप घालू शकता. मात्र दूध किंवा पाणी अजिबात घालू नये.हे पीठ भिजत ठेवण्याचीही गरज नाही. गोळा तयार झाला की लगेच नानकटाई बनवता येते.

नानकटाईला आकार द्या

नानकटाईला आकार द्या

पीठाचा छोटासा भाग हातात घ्या आणि त्याचा गोल बनवा. त्याला पेढ्यासारखा थोडासा चपटा आकार द्या. नानकटाई फार पातळ करू नका.सर्व नानकटाया शक्यतो एकाच आकाराच्या तयार करण्यासाठी छोटा खोलगट चमचा वापरू शकता. प्रत्येक गोळ्याला हलक्या हाताने दाबून त्यावर चमच्याच्या मागच्या बाजूने किंवा उपलब्ध साधनाने सुंदर डिझाइन करता येते.

आप्पेपात्रात नानकटाई कशी भाजायची?

आप्पेपात्रात नानकटाई कशी भाजायची?

यासाठी नॉनस्टिक आप्पेपात्र वापरणे उत्तम. नॉनस्टिक पात्राला तेल किंवा तूप लावण्याची गरज नाही. तयार केलेल्या नानकटाया थेट आप्पेपात्राच्या कप्प्यांमध्ये ठेवा.

गव्हाच्या पिठाची नानकटाई

गव्हाच्या पिठाची नानकटाई

आता गॅसवर लोखंडी तवा ठेवून तो आधी गरम करून घ्या. तवा प्रीहीट झाल्यानंतर त्यावर नानकटाईचे आप्पेपात्र ठेवा. त्यावर झाकण ठेवून ते व्यवस्थित बंद करा.गॅसची आच अगदी मंद ठेवा आणि नानकटाई साधारण २० ते २५ मिनिटे बेक होऊ द्या. काही वेळा आपल्या गॅसची तीव्रता, तवा आणि आप्पेपात्र यानुसार वेळ थोडा कमी-जास्त होऊ शकतो.सर्वात महत्त्वाचे म्हणजे मध्यम किंवा मोठ्या आचेवर नानकटाई करू नका. मोठ्या आचेवर नानकटाई वरून तयार होण्याआधीच खालून करपू शकते. त्यामुळे शक्यतो गॅसची सर्वात छोटी शेगडी वापरावी.

नानकटाई तयार झाली आहे हे कसे ओळखावे?

नानकटाई तयार झाली आहे हे कसे ओळखावे?

साधारण २०–२५ मिनिटांनंतर झाकण उघडून नानकटाई तपासा. नानकटाई छान फुललेली दिसेल आणि वरच्या बाजूला हलका रंग आलेला दिसेल. खालच्या बाजूनेही सुंदर सोनेरी रंग आला असेल.नानकटाईला पलटी करण्याची गरज नाही. वरची बाजूही व्यवस्थित बेक होते.जर अजून थोडी कच्ची वाटत असेल तर आणखी ३–४ मिनिटे मंद आचेवर बेक करा.बेक झाल्यानंतर नानकटाई लगेच काढू नका. ती थोडी थंड होऊ द्या. गार झाल्यावर ती आप्पेपात्रातून सहज निघते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा