खगोल विश्वातील सर्वात मोठी घटना म्हणजेच वर्षातील पहिले ‘खग्रास सूर्यग्रहण’ आता अवघ्या 7 दिवसांवर आले आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे हे ऐतिहासिक सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री लागणार असल्याने भारतातून थेट डोळ्यांनी पाहता येणार नाही. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय नागरिकही या महा-सूर्यग्रहणाचा थरार घरबसल्या अगदी मोफत ‘लाईव्ह’ पाहू शकणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

ग्रहण कुठे दिसणार?
हे सूर्यग्रहण प्रामुख्याने उत्तर गोलार्धातील देशांमध्ये दिसणार आहे. पूर्ण अंधार कुठे होणार?: ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेन या देशांमध्ये हे ग्रहण ‘खग्रास’ म्हणजेच पूर्ण स्वरूपात दिसेल. येथे सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे झाकला जाईल आणि भर दुपारी मिट्ट अंधार पडेल. आंशिक ग्रहण कुठे दिसेल?: युरोपचे इतर देश, आफ्रिकेचा काही भाग आणि उत्तर अमेरिकेत हे आंशिक स्वरूपात पाहायला मिळेल. (REF.)
भारतासाठी वेळ काय असेल?
भारतीय वेळेनुसार (IST) हे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9:04 वाजता सुरू होईल आणि 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4:25 वाजता संपेल. भारतात या काळात रात्रीची वेळ असल्याने हे ग्रहण थेट आकाशात दिसणार नाही.
भारतातून ऑनलाईन कसे आणि कोणत्या वेबसाईटवर पाहावे?
- भारतात राहूनही तुम्हाला या खगोलीय घटनेचा थरार डिजिटल माध्यमांद्वारे अगदी मोफत आणि थेट (Live) अनुभवता येईल. यासाठी खालील अधिकृत वेबसाईट्स आणि चॅनेल्सवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे:
1. NASA ची अधिकृत वेबसाईट व युट्युब: अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ आपल्या Science.NASA.gov या अधिकृत पोर्टलवर आणि ‘NASA’ या ऑफिशियल युट्युब चॅनेलवर उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांद्वारे याचे थेट प्रक्षेपण करणार आहे.
2. Time and Date वेबसाईट: खगोलीय घटनांची अचूक माहिती देणारी Timeanddate.com ही वेबसाईट जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या थेट प्रक्षेपणाची लिंक आणि अचूक काउंटडाऊन दाखवणार आहे.
3. Virtual Telescope Project: युरोपमधील प्रगत दुर्बिणींच्या माध्यमातून Virtualtelescope.eu या वेबसाईटवर अंतराळातील हा थरार लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
या ग्रहणाचा ‘सायन्स अँगल’ काय आहे?
वैज्ञानिक आणि अंतराळ संस्थांसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण:
- सूर्याच्या ‘कोरोना’चा अभ्यास: जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, तेव्हा सूर्याचे बाहेरील वातावरण म्हणजेच ‘कोरोना’ उघड्या डोळ्यांनी पाहता येतो. नासा या काळात आपली हाय-अल्टीट्यूड जेट विमाने आणि वैज्ञानिक फुगे हवेत पाठवून या कोरोनाच्या तापमानाचा आणि सौर वादळांचा अभ्यास करणार आहे.
- अल्ट्राव्हायोलेट किरणे: पृथ्वीच्या वातावरणावर आणि आयनोस्फिअरवर अचानक पडणाऱ्या अंधाराचा काय परिणाम होतो, याचे संशोधन याद्वारे केले जाईल.

