Headlines

'अभिजीत दिपके साहेब, शाळांमध्ये पालक व गावकऱ्यांनी ओतलेला घामही पहा':लोहगावच्या एका शिक्षकाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल




अभिजीत दिपके साहेब, शाळांकडे उणिवांच्या नजरेने न पाहता शिक्षक, पालक व गावकऱ्यांनी ओतलेला घामही पहा, लोहगावला दिलेल्या भेटीत कमतरता दिसली पण वर्षानुवर्ष घेतलेले मेहनत दिसली नाही का? असा सवाल करून शिक्षकांच्याही पाठीवर कौतुकाची थाप देण्याची अपेक्षा व्यक्त करणारे शिक्षकाचे पत्र सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहे. शाळांमधील उणिवा दाखवा त्यात नक्कीच सुधारणा करू, असे आश्‍वासनवजा विश्‍वासही या पत्रातून दाखवून देण्यात आला. कॉकरोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शनिवारी ता. 29 हिंगोली जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये त्यांनी शाळेतील गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त करून ‘स्कूल ठीक करो’ अभियानातून सुविधा मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर एका शिक्षकाने सोशल मीडियावर दिपके यांना उद्देशून विनंती पत्र सोशल मिडीयावर टाकले आहे. यामध्ये साहेब एक विनंती आहे, आमच्या शाळेकडे फक्त उणिवांच्या नजरेने पाहू नका. या शाळेसाठी शिक्षकांनी, पालकांनी आणि ग्रामस्थांनी ओतलेला घामही एकदा पहा, आमच्या शाळेत काही कमतरता असतील. त्या आम्ही नाकारत नाही त्या दाखवा आम्ही सुधारणा करुत, पण एका शाळेची ओळख तिच्या काही कमतरतांनी नव्हे, तर तिच्यासाठी घेतलेल्या हजारो प्रयत्नांनी होते. पत्रात काय म्हटले आहे? आमच्या शाळेचा निसर्गरम्य परिसर, परसबाग, ग्रंथालय, वाचनालय, संगणक लॅब, सीसीटीव्ही कॅमेरे लोकसहभागातून उभारलेली सौर उर्जा व्यवस्था यामध्ये शिक्षक, गावकरी व पालकांची मेहनत आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या काळात आम्ही सर्व शिक्षकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. ज्या गावातून पूर्वी शाळेला मदतीचा एक रुपयाही मिळत नव्हता, त्याच लोहगावमधून लोकसहभागातून तब्बल 2 लाख 20 हजारांचा निधी उभा केला. शाळेचा चेहरामोहरा बदलला, पण या सगळ्याची कुणी दखल घेतली नाही, तरी आम्ही काम थांबवले नाही. आमची एखादी कमतरता दिसली, ती तुम्ही दाखवलीत. पण आमची ही वर्षानुवर्षांची मेहनत तुम्हाला दिसली नाही का? बंद असलेली एखादी गोष्ट दिसली पण उभ्या केलेल्या नव्या सुविधा दिसल्या नाहीत का? एक्सपायरी झालेली, वापरातून बाजूला केलेली सामग्री दिसली, पण पोषण आहारासाठी उभी केलेली परसबाग दिसली नाही का? काही उणिवा दिसल्या पण 1,857 पुस्तकांचे ग्रंथालय दिसले नाही का? शाळेतील कमतरता दिसल्या पण 12 संगणकांची लॅब, सीसीटीव्ही कॅमेरे, सोलार व्यवस्था, क्रीडा साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची साधने दिसली नाहीत का? असा सवाल उपस्थित केला. आमच्या उणिवा मांडल्या गेल्या पण आमच्या चांगल्या कामाची दोन वाक्ये सांगितली असती तर कदाचित त्या दोन वाक्यांनी एका शिक्षकाचा थकवा दूर झाला असता. एका शिक्षकाच्या चेहऱ्यावर हसू आले असते आणि पुढच्या दिवशी तो शिक्षक पुन्हा दुप्पट उत्साहाने वर्गात उभा राहिला असता, असे त्यात नमुद केले आहे. आपला सरकारी ‘स्कूल ठीक करो’ हा उपक्रम यशस्वी व्हावा, अशीच आमची इच्छा आहे. पण सरकारी शाळा सुधारताना शिक्षकांचा आत्मविश्वासही जपा. दोष दाखवा पण दिशा द्या. उणीवा सांगा पण उपायही सांगा. टीका करा पण चांगल्या कामावर कौतुकाची एक थापही द्या, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत