टिळकवाडी पोलिसांची कारवाई : आठ जणांविरोधात एफआयआर दाखल
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : अपेक्स बिझकॉर्प एलएलपी ट्रेडिंग कंपनीवरील फसवणुकीच्या गुन्ह्यासंबंधी टिळकवाडी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अर्जुन महादेव वाघमारे (वय 36) राहणार मांगनूर, ता. चिकोडी असे त्याचे नाव आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, महेश पाटील, ए. व्ही. निलप्पन्नावर, नागेंद्र तळवार, लाडजीसाब मुल्तानी, प्रेम पवार, श्रीकांत कुरबर व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
13 जुलै 2026 रोजी अशोक विरुपाक्षी बिसगुप्पी यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात अपेक्स बिझकॉर्प एलएलपी ट्रेडिंग कंपनीविरुद्ध फिर्याद दिली होती. 3 हजारहून अधिक गुंतवणूकदारांकडून 160 कोटी रुपये गुंतवून घेऊन ही रक्कम शेअरबाजार, रियल इस्टेटमध्ये गुंतवण्याबरोबरच स्वत:च्या नावे मालमत्ता खरेदी केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते.
अधिक परतावा देण्याचे सांगून मोठ्या प्रमाणात रक्कम भरून घेऊन परतावा बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. कलम 21(1)(2), बड्स कायदा व कलम 9, केपीआयडी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी एकूण आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मॅनेजर अर्जुन वाघमारेला अटक केली आहे. त्याला बेंगळूर येथील सिटी सिव्हिल अॅण्ड सेशन न्यायालयात हजर करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकात म्हटले आहे.
