Why Use Zebrafish To Study Human Diseases: मानवी शरीरातील अल्झायमर, फीट येणे व मेंदूचे इतर आजार, डायबिटीस, स्थूलपणा , कॅन्सर ह्या आजारांवरील औषधांच्या चाचण्यांसाठी झेब्रा मासे वापरले जातात.

वेगवेगळ्या आजारांवर उपचारांसाठी नवीन औषधांची निर्मिती सतत होत असते. मानवी शरीरावर उपचार करण्यापूर्वी या औषधांचे गुणधर्म आणि चाचण्या वेगवेगळ्या ‘मॉडेल’ प्राण्यांवर तपासण्यात येतात. कुत्रे, गिनी पिग, उंदीर, ससे, मासे, कापलेल्या फळांवरील ड्रॉसोफिलासारख्या बारीक माशा आदींचा औषधांचे प्रयोग यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. मॉडेल प्राणी आजारानुसार निवडले जातात.
जनुकीय आजार समजून घेण्यासाठी होणाऱ्या प्रयोगांमध्ये झेब्रा मासे (दनियो रेरीयो) इतर मॉडेल प्राण्यांपेक्षा जास्त उपयुक्त ठरत आहेत. संशोधनाच्या मूलभूत तत्त्वानुसार मॉडेल प्राण्यांना पर्याय शोधणे, प्राण्यांवर चाचण्यांचे प्रमाण कमी करणे, तसेच दुखापत कमीत कमी व्हावी यासाठी प्राण्यांच्या चाचण्यांमध्ये सुधारणा करणे या निकषांवर झेब्रा मासे योग्य ठरले आहेत. त्यातील नर माश्यांच्या अंगावर निळे सोनेरी पट्टे, तर मादीच्या अंगावर निळे चंदेरी पट्टे असतात. चार ते पाच इंच लांबीचे हे मासे घरगुती मत्स्यालयांचे सौंदर्य वाढवतात. भारतात गंगा, ब्रह्मपुत्रा या गोड्या पाण्याच्या नद्यांच्या अधिवासात ते वाढतात.
झेब्रा मासे इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी खर्चिक आहेत, प्रयोगशाळेत त्यांना सांभाळणे सोपे आहे. ते भरपूर अंडी घालतात, त्यांचे भ्रूण पारदर्शक असतात व ते मादीच्या शरीराबाहेर वाढू शकतात. त्यामुळे त्यांची वेगाने होणारी वाढ सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येते. त्यांची बरीचशी जनुके माणसाशी मिळतीजुळती आहेत.
स्वित्झर्लंडमधील झुरिक विद्यापीठ आणि इटीएच विद्यापीठाच्या सहयोगाने या माशांच्या शरीरात सूक्ष्म रोबॉटद्वारा औषधे आजारी अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. या प्रयोगात ज्या झेब्रा माश्यांच्या पाठीच्या कण्यास दुखापत झाली होती, त्यांचे पाठीचे कणे सूक्ष्म रोबॉटच्या उपचारांमुळे पूर्ववत झाले. रुग्णास कमी त्रासदायक शस्त्रक्रिया किंवा विना शस्त्रक्रिया उपचार करता यावेत, अशा पद्धतींचा शोध वैज्ञानिक सतत घेत असतात. त्यात झेब्रा माश्यांचा मोलाचा वाटा आहे.

