‘मूर्तिमंत मराठीप्रेम’ या दोन शब्दांत ज्यांचे यथार्थ वर्णन करता येईल त्या प्रा. यास्मिन शेख यांनी सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता वयाच्या एकशेएकाव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. भाषेबद्दलची कुठलीही शंका जिला कधीही निःसंकोच विचारता येईल अशी एक हक्काची व्यक्ती आता आपल्यात उरलेली नाही या जाणिवेतून एक रितेपण मनात दाटून आले.
त्या जन्माने ज्यू. नाव जेरुशा रूबेन. तिला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. खांडेकर, फडके, माडखोलकर, नाथमाधव यांची पुस्तके; ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘सत्यकथा’ अशी मासिके आणि ‘नवयुग’, ‘चित्रा’, ‘मौज’, ‘झंकार’ अशी साप्ताहिके वाचनालयातून मिळत. ‘झंकार’मध्ये ‘उपेक्षितांचे अंतरंग’ या शीर्षकाखाली प्रा. श्री. म. माटे यांच्या कथा प्रसिद्ध होत होत्या. त्या कथांतून माटे यांची दलितांविषयीची नितांत पोटतिडीक, अनुभवांचा सच्चेपणा आणि भाषाशैली यांचा जेरुशाच्या मनावर विलक्षण प्रभाव पडला. भाषेची गोडी मनात रुजली. अनेक लेखक वाचनप्रेमातून लेखनाकडे वळल्याचे आपल्याला ठाऊक आहे. जेरुशाच्या बाबतीत वाचनप्रेमातून भाषाप्रेम असा प्रवास झाला.
तसे रुबेन यांनी घर नाशिकला बांधले होते, पण उच्चशिक्षणासाठी कुटुंब पुण्यात मुक्कामाला होते. जेरुशाने पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मराठी कॉम्पोझिशन’ हा ऐच्छिक विषय घ्यायचा निश्चय केला. मराठी भाषेविषयी वाटणारे अपरंपार प्रेम हे एक कारण होतेच; पण ‘उपेक्षितांचे अंतरंग’ लिहिणारे माटे मराठी विषय शिकवणार हेही एक महत्त्वाचे कारण होते. माटे यांनी तिला आपली मुलगीच मानले होते.
१९४६ साली जेरुशा बीए झाली; केवळ मराठीतच नव्हे, तर सर्वच विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून. प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी तिला एमएसाठी फेलोशिपही दिली; पण त्या काळात काही आजारपणामुळे तिला नाशिकला जावे लागले. त्यावेळी एमएसाठी पुस्तके कुठे मिळतील ह्याची चौकशी करण्यासाठी वडिलांबरोबर ती सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर ह्यांच्या निवासस्थानी गेली. मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत! कानेटकरांना तिचे अतिशय कौतुक वाटले. त्यांनी आवश्यक ती पुस्तके तर मिळवून दिलीच, पण शिवाय जेरुशाची व अझीज शेख ह्या तेथील चित्रमंदिरात मॅनेजर असलेल्या एका देखण्या, उमद्या, मुस्लिम तरुणाची ओळख करून दिली. कानेटकर ह्यांच्याच पुढाकाराने पुढे १९५० साली दोघांचे लग्न झाले, मिस जेरुशा रुबेन मिसेस यास्मिन शेख बनल्या; त्यांनी धर्म मात्र कधीच बदलला नाही.
एमए झाल्यानंतर शेखबाईंनी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात दोन वर्षे अध्यापन केले. नंतर मुंबईला शीव येथील एस.आय.इ.एस. महाविद्यालयात त्यांनी २७ वर्षे अध्यापन केले. इथेच विंदा करंदीकर इंग्रजी व चंद्रकांत बांदिवडेकर हिंदी शिकवत. श्री. पु. भागवत मराठीचे विभागप्रमुख होते; शेवटची सात वर्षे शेखबाई विभागप्रमुख होत्या. निवृत्तीनंतर दहा वर्षे त्या यू.पी.एस.सी.च्या परीक्षार्थींना मराठी शिकवत. एकूण ४४ वर्षे त्यांनी मराठीचे अध्यापन केले. पाठाची पूर्वतयारी केल्याशिवाय, टिपणे काढल्याशिवाय त्या कधीही वर्गावर गेल्या नाहीत. व्याकरणासारखा क्लिष्ट विषयही अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी. त्यामुळेच एक विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती आणि अनेक माजी विद्यार्थी त्यांच्या कायम संपर्कात असत. व्याकरणाचे शासनमान्य नियम सोप्या भाषेत समजावून सांगणारे पुस्तक लिहावे अशी सूचना राज्य मराठी विकास संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सरोजिनी वैद्य यांनी शेखबाईंना केली. त्यातून ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे त्यांचे पुस्तक आकाराला आले. ते पुस्तक आणि नंतरचा ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही शेखबाईंची दोन्ही पुस्तके अभ्यासकांना खूप उपयुक्त ठरली आहेत.
निवृत्तीनंतर १९९६ साली शेख जोडपे पुण्यात औंध येथे स्थायिक झाले. आमच्या घराजवळच. त्यामुळे गाठीभेटीही अधिक सुलभ झाल्या. त्यांची धाकटी मुलगी मुंबईच्या शाळेत असताना माझ्याच वर्गात होती. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांचे मोलाचे सहकार्य मिळत गेले, हे मी माझे भाग्य समजतो. ‘अंतर्नाद’च्या प्रत्येक अंकाची मुद्रिते त्या अगदी वेळेत तपासून देत. यजमान हृदयविकाराने रुग्णालयात अतिदक्षता कक्षात असतानाही त्यांनी ‘अंतर्नाद’ची मुद्रिते तिथेच बसून तपासून दिली होती. यात आपण काही विशेष करतो असेही त्यांनी कधी मला जाणवू दिले नाही. ‘अंकात एखादी चूक आढळली तर मला हातावर ओरखडा उमटल्यासारखं वाटतं’, असे त्या एकदा म्हणाल्या होत्या. हाती घेतलेले काम जास्तीत जास्त चांगले करणे हीच त्यामागची भावना होती.
भाषा हा आपला सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे असे त्या मानत. भाषेच्या संदर्भात त्यांची काही आग्रही मते होती. उदाहरणार्थ, प्रमाणभाषेचा आग्रह. आजकाल वेगवेगळे समाजघटक आपापल्या बोलीचा आग्रह धरत असतात. शेखबाईंचा कुठल्याच बोलीभाषेला विरोध असा नव्हता. ललित साहित्यात वातावरणनिर्मितीसाठी बोलीभाषा आवश्यक असते, पण वैचारिक लेखनात मात्र प्रमाणभाषाच हवी, असे त्या म्हणत. नाहीतर झाडबोलीत केलेले लेखन कोकणातील वाचकाला कसे कळणार किंवा मालवणीत केलेले लेखन चंद्रपूरातील वाचकाला कसे समजेल? साधारण आशय संदर्भाने कळेलही, पण त्या आकलनात नेमकेपणा कसा येणार? महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत आणि प्रत्येकाने स्वतःच्याच बोलीभाषेत लेखन केले तर अनागोंदी माजेल, असे त्यांचे मत होते.
त्याचप्रमाणे व्याकरणाचे नियमही आपण पाळलेच पाहिजेत हाही त्यांचा आग्रह असे. भाषेत काळाच्या ओघात फेरफार होतच जातात; त्या दृष्टीने प्रमाणभाषा लेखनाचे नियम बदलायलाही त्यांचा विरोध नसे; पण तसे घडत नाही तोवर तरी शासनाने मंजूर केलेले अठरा नियम पाळायलाच हवेत, असे त्या म्हणत. दुर्दैवाने व्याकरणाचे महत्त्व अनेक लेखकांनाही पटलेले नसते. एका कथाशिबिरात त्या म्हणाल्या होत्या, ‘आपण जेव्हा एखादा अनुभव घेतो तेव्हा त्यासाठी शब्दांची गरज नसते. पण जेव्हा तो लेखनातून व्यक्त करतो तेव्हा मात्र शब्दांची गरज असते; किंबहुना शब्द हेच लेखकाचे मूलद्रव्य असते. त्यातूनच लेखनाला नेमकेपणा येतो. पुष्कळदा एखादी कथा अत्यंत कलापूर्ण असते, तिचे अंतरंग सौंदर्यपूर्ण असते; पण तिचे बाह्य रूप मात्र तितकेसे निर्दोष नसते. कथेचे हे बाह्यांग तितकेच महत्त्वाचे आहे, जितके कथेचे अंतरंग. कारण त्या बाह्यांगातूनच वाचक कथेच्या अंतरंगात शिरणार असतो. म्हणूनच लेखकानेही व्याकरणाकडे लक्ष द्यायला हवे.’
‘मी सॅड फील करते’ किंवा ‘तो सॉलिड हर्ट झाला’ अशी आजकालची प्रदूषित भाषा त्यांना खटकायची. ‘मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजल्याशी मतलब’ हा दृष्टिकोन त्यांना अगदी अमान्य होता. ‘चॅनेल’ऐवजी वाहिनी, ‘सीरियल’ऐवजी मालिका, ‘स्क्रिप्ट’ऐवजी संहिता, ‘रिस्पॉन्स’ऐवजी प्रतिसाद किंवा ‘स्पॉन्सर्ड’ऐवजी पुरस्कृत यांसारख्या सोप्या प्रतिशब्दांचा त्या आग्रह धरत. केवळ सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे पुरेसे नाही, भाषेची महत्ता आपल्यालाच प्रयत्नपूर्वक टिकवावी लागेल असे त्या म्हणत.
भाषाप्रेमाव्यतिरिक्त धार्मिक सौहार्द हाही त्यांचा एक विशेष. तसे पाहिले तर शेख आडनावाचा त्यांना कधीकधी त्रासही झाला आहे. पुण्यात राहायचे ठरवले तेव्हा त्या फ्लॅट शोधत होत्या. एक फ्लॅट त्यांनी पसंत केला होता, पण प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी जेव्हा शेख जोडपे त्या बिल्डरच्या कार्यालयात गेले व त्यांचे आडनाव शेख आहे हे स्पष्ट झाले, तेव्हा ‘सध्या फ्लॅट उपलब्धच नाही’ असे त्यांना ऐकावे लागले होते! माहेरच्या नावामुळे त्यांना इस्राएलचा व्हिसा नाकारला गेला आणि सासरच्या नावामुळे कतारचा व्हिसा नाकारला गेला होता त्याचा विषादही त्यांनी कधीच बाळगला नाही. लहानपणी एकदा त्यांना मंदिर प्रवेश नाकारला गेला होता. पण त्याचवेळी त्यांच्या बरोबरच्या तीन हिंदू मैत्रिणीदेखील ‘हिला नाही सोडलत तर आम्हीही आत येणार नाही’ असे म्हणत बाजूला झाल्या. कटू अनुभवाचे भांडवल न करता त्या अनुभवाला एक रुपेरी किनारही होती आणि तीच फक्त शेखबाईंनी लक्षात ठेवली. आपण कोणत्या धर्मात वा जातीत जन्माला येणार हे आपण स्वतः कधीच ठरवू शकत नाही आणि त्यामुळे माणुसकी हाच आपला धर्म मानावा असे त्यांना वाटे. ज्यू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांमध्ये मृतदेहाचे दफन केले जाते; पण शेख पती-पत्नींचे, त्यांच्याच लेखी विनंतीनुसार दहन केले गेले हे लक्षणीय आहे. ‘माझे बहुतेक स्नेहीजन हिंदूच आहेत’ असे त्या म्हणत.
शेखबाईंचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांना प्रसिद्धीचा जराही सोस नव्हता. २०१५ साली मिळालेला गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार हा त्यांना मिळालेला पहिला मोठा पुरस्कार. तोही अगदी वयाच्या नव्वदीत मिळालेला. ही एकच गोष्ट त्यांच्या प्रसिद्धिपराङमुखतेची साक्ष पटवायला पुरेशी आहे. शेवटच्या दहा वर्षांत मात्र अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले.
तीन वर्षांपूर्वी माझा सत्तराव्या वाढदिवशी त्यांनी केलेले भाषण मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. ‘भानू काळे यांनी माझ्या पोटातून जन्म घेतला नसला तरी त्यांना मी माझा मानसपुत्रच मानते. या माझ्या प्रिय मानसपुत्राला दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करते,’ हे त्यांचे शब्द ऐकताना माझे डोळे पाणावले होते. याहून अधिक कुठला गौरव माझ्या वाट्याला या आयुष्यात येणार होता?
अगदी शंभरी गाठेस्तोवर दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामात त्या गर्क असत. कुठलाही संदर्भ विचारा; लगेच सांगतील; स्वतःला ठाऊक नसेल तर मुद्दाम शोध घेऊन माहिती पुरवतील. तेही अगदी हसतमुखाने. इतक्या वर्षांत त्यांच्या चेहर्यावर कधी वैताग किंवा कंटाळा बघितल्याचे आठवत नाही. सतत स्वतःला आवडीच्या कामात गुंतवून घेणे त्यांना आवडत असे; त्यातूनच त्यांना ऊर्जा मिळत असावी. शतकपूर्ती केलेली ही विदुषी मराठीचे वैभव होते. वृद्धत्वाचा कोरडा, करडा स्पर्श त्यांना कधीच झाला नाही.
वर्षातील सर्वांत मोठा दिवस २१ जून हा त्यांचा जन्मदिन आणि अलीकडे तो ‘जागतिक योग दिन’ म्हणूनही साजरा होतो हाही एक सुखद योग. योग: कर्मसु कौशलम् असे भगवद्गीता सांगते. मराठी भाषेचे संवर्धन ही त्यांच्यासाठी एक योगसाधनाच होती. त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलींनी एक खासगी समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्यांच्या लेखांचे एक संकलन प्रत्येक पाहुण्याला भेट म्हणून दिले गेले. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेखबाईंनी सही केली होती आणि वर लिहिले होते, ‘मातृभाषेवर प्रेम करा.’ हा त्यांचा जीवनसंदेश अंगी बाणवणे हीच या चिरतरुण वैयायोगिनीला वाहिलेली उचित श्रद्धांजली असेल.
(लेखक ज्येष्ठ संपादक आहेत.)

