Anjum Chopra : भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर आणि टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारताच्या या स्थितीला कारणीभूत कोणत्या गोष्टी घडल्य आहेत याच्यावर स्पष्ट भाष्य केलं आहे.

लॉर्ड्सवर भारताने उभारलेल्या १७० धावा ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध पुरेशा नव्हत्या, असं अंजुम यांचं स्पष्ट मत आहे. मोठ्या संघाविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर आणखी धावा करणे आणि सुरुवातीलाच दोन-तीन मोठे धक्के देणे आवश्यक असते. केवळ एक-दोन विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला रोखणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
अंजुम यांनी सर्वाधिक आक्षेप घेतला तो अखेरच्या षटकांतील निर्णयांवर. जेमिमा रॉड्रिग्जला रिटायर्ड आऊट करणं आणि ऋचा घोषला खूप उशिरा फलंदाजीला पाठवणं भारतासाठी महागात पडलं, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या मते, ऋचा १७ व्या षटकातच मैदानात आली असती, तर भारताला अखेरच्या षटकांत अधिक वेगाने धावा करता आल्या असत्या. त्याशिवाय पाचव्या गोलंदाजाची समस्याही टीमपुढे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.
फलंदाजी क्रमातील सततच्या बदलांवरही अंजुम यांनी नाराजी व्यक्त केली. यास्तिका भाटिया तिसऱ्या क्रमांकासाठी तयार असेल, तर तिला त्या स्थानावर खेळवलं का नाही? इंग्लंड मालिकेत जेमिमा तिसऱ्या क्रमांकावर खेळत होती, मग विश्वचषकात तो क्रम का बदलला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, हरमनप्रीत कौरने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती.
ऋचा घोष ही चौथ्या क्रमांकासाठी सर्वात प्रभावी फलंदाज असतानाही तिला त्या स्थानावर सातत्याने संधी देण्यात आली नाही, हीदेखील मोठी चूक असल्याचं अंजुम यांनी म्हटलं. भारतीय संघाची खरी ताकद फलंदाजी आहे. त्यामुळे फलंदाजांना त्यांच्या नैसर्गिक भूमिकेत खेळू दिलं पाहिजे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात धावा प्रति ओव्हर गतीने खेळून विजय मिळत नाही. मोठ्या सामन्यात किमान नऊ धावा प्रति ओव्हर वेग आवश्यक असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) याच भारतीय खेळाडू तडाखेबाज क्रिकेट खेळतात आणि १८० ते २०० धावा सहज उभारतात. मात्र, भारताची जर्सी घातल्यानंतर तोच आत्मविश्वास आणि आक्रमकता दिसत नाही, अशी खंतही अंजुम यांनी व्यक्त केली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय अव्वल फलंदाजांनी अपेक्षित धाडस दाखवलं नाही आणि त्याचाच फटका संघाला विश्वचषकातून बाहेर पडताना बसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

