Headlines

Why Is Rahul Gandhi Wearing a Pink Shirt Is There a Political Message Behind It | फॅशन स्टेटमेंट की राजकीय डावपेच? राहुल गांधींनी गुलाबी शर्ट का घातला? हे आहे गुलाबी रंगाचं महत्त्व


Rahul Gandhi Latest Look: प्रयागराजमधील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी गुलाबी शर्टमध्ये दिसले. त्यामुळे त्यांचा नवा पेहराव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. पांढऱ्या टी-शर्टनंतर गुलाबी रंगाचा स्वीकार ही केवळ एक स्टाईल आहे की त्यामागे काही राजकीय संदेश आहे, यावर नेटकरी विचारमंथन करत आहेत.

Rahul Gandhi pink shirt
(फोटो सौजन्य – @ChhatraJodo/x.com)
भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे बदल व्हावेत आणि पेपरफुटी प्रकरणी जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई व्हावी, यासाठी देशभरात सध्या विविध क्षेत्रातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये झालेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत भारतीय शिक्षण पद्धतीवर भाष्य केलं. पण भाषण करत असताना त्यांनी घातलेल्या गुलाबी शर्टाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. कारण कालपर्यंत ते पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसायचे. पण यावेळी त्यांनी गुलाबी शर्ट घातला. या गोष्टीची नोंद अनेक राजकीय तज्ज्ञांनी घेतली असून, हे केवळ एक स्टाईल स्टेटमेंट नाही, तर यामागे काही राजकीय संदेश असल्याचं म्हटलं जात आहे. असो, पण गुलाबी रंगाचं महत्त्व काय? किंवा राहुल गांधींनी गुलाबी रंगाचा शर्ट का घातला असेल? चला, जाणून घेऊया.

का घातला गुलाबी रंगाचा शर्ट?

​ ​

भारतामधील राजकीय नेते हे प्रामुख्यानं पांढऱ्या रंगाचे सदरे किंवा खादीपासून तयार केलेले कपडे घालतात. कारण पांढरा रंग हा सत्य, प्रामाणिकपणा, शांतता आणि अहिंसेचं प्रतीक मानला जातो. पण राहुल गांधी हे पारंपारिक कपड्यांऐवजी सध्या गुलाबी शर्टमध्ये दिसत आहेत.

पांढऱ्या रंगाप्रमाणेच गुलाबी रंगालाही खूप जास्त महत्त्व आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिका आणि युरोपमध्ये गुलाबी रंग ट्रेंडमध्ये होता. आज हा रंग प्रामुख्यानं महिलांशी जोडला जातो. पण तेव्हा पुरुष गुलाबी रंगाचे कपडे घालायचे. अगदी राजकीय नेतेसुद्धा तरुणांशी संवाद साधण्यासाठी गुलाबी रंगाला प्राधान्य द्यायचे. कारण गुलाबी रंग हा प्रगतीशील विचार, सुधारणा आणि सामाजिक बदलाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे १९व्या शतकाच्या मध्यावर अमेरिकेत झालेल्या महिला आंदोलनातही गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला. त्यानंतर LGBTQ कम्युनिटीनंसुद्धा हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आंदोलनात गुलाबी रंगाचा वापर केला. त्यामुळे हळूहळू गुलाबी रंग हा प्रेम, माया, करुणा, संवेदनशीलता, आशावाद आणि सौम्यता यांच्याशी जोडला गेला. अन् याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यासाठी गुलाबी रंगाचा शर्ट घातला, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.

सार्वजनिक पेहरावात पुन्हा केला बदल

राहुल गांधी सुरुवातीला इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान करायचे. पण भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी पांढरा टी-शर्ट घातला. अन् पुढे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेचा तो एक महत्त्वाचा भाग बनला. राजकारण्यांनीही काळानुसार बदललं पाहिजे आणि कुर्ता-पायजम्याऐवजी टी-शर्ट हे त्याचं प्रतीक असू शकतं, अशा प्रतिक्रिया यावर अनेक राजकीय नेत्यांनी दिल्या. पण आता त्यांनी पुन्हा आपल्या सार्वजनिक पेहरावात बदल केला आहे. त्यामुळे हा गुलाबी शर्टसुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा