Google च्या रिक्रूटर अमांडा यांनी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रिझ्युमे तयार करण्याच्या तीन महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. जॉब डिस्क्रिप्शननुसार रिझ्युमे तयार करणं, पात्रता स्पष्टपणे नमूद करणं आणि रिझ्युमे संक्षिप्त ठेवणं यामुळे निवड होण्याची शक्यता वाढते, असं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाल्या अमांडा?
अमांडा यांनी Life at Google या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी नोकरीसाठी अर्ज करताना पाठवण्यात येणाऱ्या रिझ्युमेमध्ये कोणत्या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे सांगितलं आहे.
पहिली गोष्ट – ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात, त्या पदानुसार रिझ्युमे तयार करा. तुमच्याकडे असलेली कौशल्ये, अनुभव आणि शैक्षणिक पात्रता त्या पदासाठी कशी योग्य आहे, हे स्पष्टपणे नमूद करा.
पात्रता ठळकपणे नमूद करा – तुमची शैक्षणिक पात्रता रिझ्युमेमध्ये ठळकपणे नमूद करा. त्यामुळे रिक्रूटरला आवश्यक पात्रता पूर्ण झाल्याचं लगेच लक्षात येईल आणि तुमच्या रिझ्युमेकडे गांभीर्याने पाहिलं जाईल.
रिझ्युमे स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवा – रिक्रूटर्सना दररोज मोठ्या प्रमाणावर अर्ज तपासावे लागतात. त्यामुळे तुमचा रिझ्युमे स्पष्ट, संक्षिप्त आणि वाचायला सोपा असावा. तसेच, त्या पदाशी संबंधित महत्त्वाच्या कामगिरीचा त्यात उल्लेख असावा.
नेटकऱ्यांनी मानले आभार
या तीन गोष्टींकडे लक्ष दिल्यास Googleच नव्हे, तर कोणतीही कंपनी तुमच्या रिझ्युमेकडे गांभीर्याने पाहू शकते आणि पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला संधी मिळू शकते. एकदा रिझ्युमे निवडला गेला की परीक्षा किंवा मुलाखतीला सामोरं जाताना आत्मविश्वासही वाढतो. अमांडा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स दिल्याबद्दल अनेक नेटकरी त्यांचे आभार मानत आहेत.

