Headlines

Wake Up Ronaldo AI Anime Viral Video Gives Fans Goosebumps Before Portugal vs Croatia Clash | उठ रोनाल्डो… हीच तुझी शेवटची संधी आहे! निर्णायक सामन्यापूर्वी रोनाल्डोच्या डोक्यात काय सुरू आहे? व्हिडीओ पाहून अंगावर येतील शहारे


Ronaldo Anime Video: ख्रिस्तियानो रोनाल्डो येत्या काही तासांत क्रोएशियाविरुद्ध खेळणार आहे. फिफा वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. कारण पोर्तुगालला पुढील फेरीत जायचं असेल, तर या सामन्यात विजय मिळवावाच लागेल. याच पार्श्वभूमीवर रोनाल्डोचा AI अ‍ॅनिमे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Ronaldo AI Video
(फोटो सौजन्य – deepvaultai/Instagram)
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटूंपैकी एक आहे. भारतामध्ये क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉल फारसा खेळला जात नाही. शिवाय भारतीय संघ फिफा वर्ल्ड कपमध्येही खेळत नाही. तरीदेखील देशभरातील लाखो-करोडो चाहते रोनाल्डोनं यावेळी तरी फिफा वर्ल्ड कप जिंकावा, यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. फिफा वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालचा संघ ३ जुलै रोजी क्रोएशियाविरुद्ध भिडणार आहे. हा सामना रोनाल्डोसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कारण या सामन्यात पोर्तुगालचा पराभव झाला, तर संघ स्पर्धेबाहेर जाईल. त्यामुळे जगभरातील चाहत्यांच्या नजरा रोनाल्डोकडे लागल्या आहेत. तो किती गोल करेल, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण दुसरीकडे रोनाल्डोच्या मनात सध्या काय सुरू असेल? ही महत्त्वाची मॅच जिंकण्यासाठी तो काय विचार करत असेल? हे दाखवण्यासाठी एका AI अ‍ॅनिमे व्हिडिओ क्लिपची निर्मिती करण्यात आली आहे. या व्हिडिओतील दृश्य पाहून खरंच तुमच्याही अंगावर शहारे येतील.

काय दाखवलंय व्हिडिओमध्ये?

​ ​

हा व्हिडिओ deepvaultai या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही व्हिडिओ क्लिप AI च्या मदतीनं तयार करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका अटीतटीच्या सामन्यात रोनाल्डो जमिनीवर पडला आहे आणि पुढे काय करायचं, याचा तो विचार करत आहे. त्याच वेळी त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्याच तरुणपणाची झलक उभी राहते. भूतकाळातील तरुण रोनाल्डो वर्तमानातील रोनाल्डोशी संवाद साधतो आणि त्याला अधिक चांगलं खेळण्यासाठी आत्मविश्वास देतो. त्यामुळे रोनाल्डोमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा संचारते आणि तो गोल करण्यासाठी सज्ज होतो. अशा आशयाचं दृश्य या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी निर्मात्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. अनेक जण म्हणत आहेत, “ही क्लिप रोनाल्डोपर्यंत पोहोचवा. आम्हाला पुन्हा एकदा असाच खतरनाक रोनाल्डो पाहायचा आहे.”

पोर्तुगालची कामगिरी संभ्रमात टाकणारी

पोर्तुगालचा संघ या वर्ल्ड कपमध्ये कधी खूपच चांगला खेळताना दिसतो, तर कधी अत्यंत सुमार कामगिरी करताना दिसतो. ग्रुप स्टेजमध्ये त्यांनी ३ पैकी फक्त १ सामना जिंकला, तर उर्वरित दोन सामने बरोबरीत सुटले. या तीन सामन्यांमध्ये रोनाल्डोनं फक्त २ गोल केले आहेत. त्यामुळे क्रोएशियाविरुद्ध पोर्तुगालचा संघ कसा खेळणार, याबाबत फुटबॉल समीक्षकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. कारण रोनाल्डोव्यतिरिक्त त्यांच्या संघात ब्रुनो फर्नांडिस, बर्नार्डो सिल्वा, विटिन्हा, रुबेन डायस, नुनो मेंडिस आणि जोआओ नेव्हेस यांसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. मात्र, त्यांनी अद्याप आपल्या नावाला साजेशी कामगिरी केलेली नाही. तरीही चाहत्यांना आशा आहे की, रोनाल्डोचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि पोर्तुगाल हा सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश करेल.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा