Ronaldo Anime Video: ख्रिस्तियानो रोनाल्डो येत्या काही तासांत क्रोएशियाविरुद्ध खेळणार आहे. फिफा वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. कारण पोर्तुगालला पुढील फेरीत जायचं असेल, तर या सामन्यात विजय मिळवावाच लागेल. याच पार्श्वभूमीवर रोनाल्डोचा AI अॅनिमे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय दाखवलंय व्हिडिओमध्ये?
हा व्हिडिओ deepvaultai या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही व्हिडिओ क्लिप AI च्या मदतीनं तयार करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका अटीतटीच्या सामन्यात रोनाल्डो जमिनीवर पडला आहे आणि पुढे काय करायचं, याचा तो विचार करत आहे. त्याच वेळी त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्याच तरुणपणाची झलक उभी राहते. भूतकाळातील तरुण रोनाल्डो वर्तमानातील रोनाल्डोशी संवाद साधतो आणि त्याला अधिक चांगलं खेळण्यासाठी आत्मविश्वास देतो. त्यामुळे रोनाल्डोमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा संचारते आणि तो गोल करण्यासाठी सज्ज होतो. अशा आशयाचं दृश्य या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी निर्मात्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. अनेक जण म्हणत आहेत, “ही क्लिप रोनाल्डोपर्यंत पोहोचवा. आम्हाला पुन्हा एकदा असाच खतरनाक रोनाल्डो पाहायचा आहे.”
पोर्तुगालची कामगिरी संभ्रमात टाकणारी
पोर्तुगालचा संघ या वर्ल्ड कपमध्ये कधी खूपच चांगला खेळताना दिसतो, तर कधी अत्यंत सुमार कामगिरी करताना दिसतो. ग्रुप स्टेजमध्ये त्यांनी ३ पैकी फक्त १ सामना जिंकला, तर उर्वरित दोन सामने बरोबरीत सुटले. या तीन सामन्यांमध्ये रोनाल्डोनं फक्त २ गोल केले आहेत. त्यामुळे क्रोएशियाविरुद्ध पोर्तुगालचा संघ कसा खेळणार, याबाबत फुटबॉल समीक्षकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. कारण रोनाल्डोव्यतिरिक्त त्यांच्या संघात ब्रुनो फर्नांडिस, बर्नार्डो सिल्वा, विटिन्हा, रुबेन डायस, नुनो मेंडिस आणि जोआओ नेव्हेस यांसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. मात्र, त्यांनी अद्याप आपल्या नावाला साजेशी कामगिरी केलेली नाही. तरीही चाहत्यांना आशा आहे की, रोनाल्डोचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि पोर्तुगाल हा सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश करेल.

