US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला असून त्यामुळे होर्मुझमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेनं सलग ९० मिनिटं इराणच्या गंडस्थळावर हल्ले केले आहेत. अमेरिकेकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान: अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. दोन्ही देशांनी सलग चौथ्या दिवशी एकमेकांवर हल्ले चढवले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. बुधवारी हा संघर्ष आणखी धोकादायक टप्प्यावर पोहोचला. अमेरिकेच्या सैन्यानं इराणच्या केशम बेटाच्या दक्षिणेला असलेल्या ग्रेटर टुनब बेटावर ९० मिनिटं अखंडपणे हल्ले चढवले. ग्रेटर टुनबवर सलग दीड तास क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा मारा करण्यात आला. हा बेटांचा समूह पर्शियाच्या आखातात लेसर टुनब बेटाजवळ आणि इराणच्या केशम बेटाच्या दक्षिणेला वसलेला आहे. त्याचं क्षेत्रफळ जवळपास १०.३ चौरस किलोमीटर आहे. इराणची प्रतिहल्ला करण्याची क्षमता नष्ट करण्यासाठी अमेरिकेनं त्यांच्या गंडस्थळावरच हल्ला चढवला आहे.
इराणच्या टुनब बेटावर करण्यात आलेल्या हल्ल्याची सविस्तर माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून देण्यात आलेली आहे. ‘वॉशिंग्टन डीसीच्या सकाळी ७.३० वाजता आणि तेहरानमध्ये दुपारचे ३ वाजलेले असताना इराणच्या विरोधात हल्ल्यांचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला,’ अशी माहिती एक्स पोस्टमधून देण्यात आली आहे. ‘सेंटकॉमनं ९० मिनिटांच्या हल्ल्यांदरम्यान ग्रेटर टुनब बेटाच्या तटांवरील सुरक्षा यंत्रणा आणि क्रूझ मिसाईल स्टोरेज आणि लॉन्च साईट्सवर अचूक हल्ले केले. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यावसायिक जहाजांवर हल्ले करण्याची इराणची क्षमता आणखी घटली आहे,’ असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. Middle East Conflict: प्रवाशांनी भरलेल्या इराणच्या ‘महान’ विमानावर लँडिंगवेळी हल्ला; आसमंतात धुराचे लोट, तणाव वाढला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांकडून २० टक्के शुल्क आकारण्याचा वादग्रस्त प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतला. यानंतर अमेरिकेच्या सैन्यानं ग्रेटर टुनबवर जोरदार हल्ला चढवला. जहाजांकडून शुल्क आकारणी करू नका. त्याऐवजी आम्ही अमेरिकेत अब्जावधींची गुंतवणूक करतो, अशी ऑफर आखाती देशांच्या नेत्यांनी दिली. त्यामुळे टोल योजना मागे घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. पण दुसरीकडे अमेरिकेनं इराणी बंदरांची नाकेबंदी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
ग्रेटर टुनब म्हणजे काय? ग्रेटर टुनब पर्शियन आखातात होर्मुझच्या प्रवेशद्वाराच्या जवळ असलेलं एक लहानसं बेट आहे. बेटाचा आकार लहान असला तरी त्याचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुंबई जवळ घारापुरी बेटाइतका आकार असलेल्या ग्रेटर टुनबचं प्रशासन इराणच्या हाती आहे. या बेटाचं क्षेत्रफळ १०.३ चौरस किलोमीटर आहे. होर्मुझच्या सागरी मार्गाच्या अतिशय जवळ असल्यानं इथून जाणाऱ्या तेल टँकर्स आणि मालवाहू जहाजांवर नजर ठेवण्याचं काम ग्रेटर टुनबवरुन केलं जातं.
होर्मुझवर वचक ठेवण्यासाठी इराणकडून या बेटाचा वापर केला जातो. याच बेटाचा उपयोग व्यावसायिक जहाजांवर हल्ले करण्यासाठी केला जातो. काही दिवसांपूर्वी इराणनं इथूनच हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये जहाजांवरील जवळपास डझनभर कर्मचारी मारले गेले.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा