Headlines

Ujjwal Nikam Appointed Special Prosecutor in Ashok Kharat Case


अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकरणात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या आडून झालेल्या कथित लैंगिक शोषण प्रकरणातील न्यायालयीन लढाई आता आणखी आक्रमक होणार आहे.

Ashok Kharat case
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि चमत्कारांच्या नावाखाली महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या बहुचर्चित प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईत देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची अधिकृत एन्ट्री झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी अहिल्यानगरचे अनुभवी फौजदारी वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने गुरुवारी (दि. ११ जून) यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. त्यामुळे अशोक खरात प्रकरणातील खटल्याला आता अधिक धार प्राप्त झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

अशोक खरातविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी निकम-फळे या जोडीवर सोपविण्यात आली आहे. यापूर्वीच राज्य सरकारने या संवेदनशील प्रकरणासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावर विश्वास टाकत विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. आता त्यांच्या सोबत परिमल फळे यांची नियुक्ती झाल्याने सरकारची कायदेशीर बाजू अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. राज्य सरकारच्या वतीने कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, अशोक खरातविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी निकम-फळे या जोडीवर सोपविण्यात आली आहे.

निकम-फळे जोडीमुळे खरात प्रकरणात पुढील सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वकील परिमल फळे हे फौजदारी कायद्यातील अनुभवी वकील म्हणून ओळखले जातात. राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य हत्या प्रकरण, नेवासे येथील वकील रियाज पठाण हत्या प्रकरण यांसारख्या गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती. याशिवाय रेखा जरे खून प्रकरण, संदीप वारळ हत्या प्रकरणासह अनेक चर्चित खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा निकम-फळे या अनुभवी आणि आक्रमक विधिज्ञ जोडीवर विश्वास दाखविल्याने खटल्याच्या पुढील सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या नियुक्तीमुळे आरोपीविरोधातील कायदेशीर लढाई अधिक तीव्र होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अशोक खरात हा सध्या कोठडीत आहे. त्याने केलेले कृत्य आता सर्वांसमोर आलेले आहे. तो अशाप्रकारची कृत्य कधीपासून करत होता, त्याने यातून किती संपत्ती लाटली याची सविस्तर माहिती आगामी काळात समजू शकते. या प्रकरणात आता कोर्टात काय-काय घडामोडी घडतात? दोन्ही बाजूंनी काय युक्तिवाद केला जातो? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा