Uddhav Thackeray: नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उबाठाकडून मुंबईत आंदोलन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारला लक्ष्य केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: रोजगार, शिक्षण न देणारं दळभद्री सरकार बदललंच पाहिजे. तुम्ही आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा. तुमच्या मनात पेटलेली आग सत्तांतर होईपर्यंत कायम धगधगती राहायला हवी. त्या आगीनं हुकूमशाही सरकार भस्म व्हायला हवं, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारला लक्ष्य केलं. मुंबईत दादरमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केला. सोबतच केंद्र सरकारचा समाचार घेतला.
नीट पेपरफुटी विरोधात पर्यावरणादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. तब्बल ३ आठवड्यांपासून वांगचुक उपोषणाला बसले आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र अद्याप तरी सरकारच्या वतीनं त्यांच्या सोबत कोणीही संवाद साधलेला नाही. पोलिसांनी वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून ताब्यात घेतलं असून वांगचुक यांचं उपोषण तिथूनही सुरू आहे. या सगळ्यावरून ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.
सोनम वांगचुक यांनी देशासाठी दिलेलं योगदान उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ‘सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलं आणि या दळभद्री सरकारनं देशाला काय दिलं, याचा हिशोब होऊन जाऊ दे. बर्फात, कडाक्याच्या थंडीत देशांच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी सोलर कॅम्प उभारले. लडाखमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्यानं कृत्रिम आईस माउंटन तयार केला. त्याच सोनम यांना केंद्र सरकार देशद्रोही ठरवतंय,’ अशा शब्दांत ठाकरेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
याचवेळी ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत , वरिष्ठ नेते दत्तात्रय होसबळे यांच्या विधानांचा संदर्भ दिला. पाकिस्तान सोबत भारतानं चर्चा करायला हवी, असं विधान होसबळे यांनी केलं होतं. त्याला भागवत यांनीदेखील सहमती दर्शवली होती. जे लोक आमच्या सैनिकांच्या आयुष्यावर उठलेत, त्यांच्यासोबत चर्चा करण्याची यांची तयारी आहे. पण ज्या व्यक्तीनं आपल्या सैनिकांची सेवा केली. लष्करासाठी योगदान दिलं. त्यांच्याशी चर्चा करायला मात्र हे सरकार चर्चा करण्यास तयार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी संघासह भाजपवर तोफ डागली. आज जे देशात सुरू आहे, तेच संघाच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र आहे का, असा सवाल त्यांनी मोहन भागवत यांना विचारला.
सोनम वांगचुक यांचं आंदोलन झाकण्याचा प्रयत्न केलात, तरी सत्य लपणार नाही. तुमच्या पापांवर पांघरुण घालता येणार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी १५ वर्षांपूर्वी झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण करून दिलीय. अण्णा हजारे उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या आंदोलनाला देशभरात प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी कोणीही त्यांना देशद्रोही किंवा चीनचा हस्तक म्हटलं नव्हतं. त्यावेळी सत्तेत असलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अण्णांशी चर्चा करायला विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. पण आता सत्तेत असलेल्या सरकारकडून संवाद साधण्याऐवजी दडपशाही सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा