Headlines

Tukaram Mundhe Lead FDA Raid on Food Oil Factory And Seized food oil worth 293 million in Chhatrapati Sambhajinagar


छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. या कारवाईत पावणेतीन कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत ‘बागारिया’ समूहाचे दोन कारखाने सील करण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील दोन नामांकित ऑईल रिपॅकिंग कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक गुप्त छापे टाकून तब्बल 2 कोटी 93 लाख 35 हजार 603 रुपयांचा संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. एफडीएच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या दोन्ही कंपन्यांचे अन्न परवाने प्रशासनाने तातडीने निलंबित केले आहेत.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या जिल्हा पथकाने 11 जुलै 2026 रोजी पैठण तालुक्यातील गेवराई तांडा येथील ‘मेसर्स बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स’ आणि शहरातील अभिनय टॉकीजच्या मागे, लक्ष्मण चावडी भागात असलेल्या ‘मे. बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि.’ या दोन्ही आस्थापनांवर एकाच वेळी धडक तपासणी मोहीम राबवली. या छाप्यात कारखान्यांच्या आत सुरू असलेला भयानक कारभार आणि अस्वच्छता पाहून स्वतः तपासणी अधिकारीही चक्रावून गेले.

Tukaram Mundhe

आधीच वापरलेले घाणेरडे डबे अन् गंजलेली यंत्रसामग्री

या धडक कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा कायद्याच्या चिंधड्या उडवणाऱ्या अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ग्राहकांच्या घरात जाणाऱ्या तेलाचे पॅकिंग करण्यासाठी कारखान्यात आधीच वापरलेले, जुने आणि कमालीचे घाणेरडे डबे सर्रासपणे वापरले जात होते.

रिफायनरी विभागातील यंत्रसामग्री, कारखान्याची फरशी, भिंती आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत दुर्लक्षित होता. तेलाच्या यंत्रांवर प्रचंड धूळ, कोळी-काजळी आणि गंज चढलेला होता, ज्यातूनच तेल पॅक होत होते. कारखान्यामध्ये अत्यंत घाणेरडे आणि दुर्गंधी सुटलेले तेल उघड्या टबमध्ये भरून ठेवण्यात आले होते. बंद पडलेला अस्वच्छ रिफायनरी विभाग आणि चालू असलेला रिपॅकिंग विभाग एकाच आवारात असल्याने तेलामध्ये दूषितीकरणाचा मोठा धोका होता.

ना प्रयोगशाळा, ना तांत्रिक अधिकारी; फक्त नफेखोरीचा धंदा

तपासणी दरम्यान आढळून आले की, या दोन्ही मोठ्या संस्थांमध्ये तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक असलेली अंतर्गत प्रयोगशाळा अजिबात कार्यरत नव्हती. तसेच तेलाचा कोणताही विश्लेषण अहवाल कंपनीकडे नव्हता.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांची निर्मिती होत असताना तेलाचा दर्जा तपासण्यासाठी कोणत्याही तांत्रिक किंवा तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती येथे करण्यात आलेली नव्हती. केवळ नफा कमावण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास तडजोड केली जात होती.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा