Headlines

Tukaram mundhe fda action rs 90 42 lakh seized Pakistan cosmetic illegal ayurvedic medicines; 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?


Fda Tukaram Mundhe Raid : महाराष्ट्रात FDAने अवघ्या तीन दिवसांत पाच शहरांत मोठी कारवाई केली. पाकिस्तानी ब्युटी क्रीम, बिनपरवान्याची आयुर्वेदिक औषधं, दिशाभूल करणारे दावे आणि हॉस्पिटलमधील औषध खरेदीच्या सक्तीमागचं धक्कादायक चित्र या मोहिमेत समोर आलं.

tukaram mundhe fda action rs 90 42 lakh seized
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गोरेपणाचं स्वप्न दाखवणारी पाकिस्तानात तयार झालेली ब्युटी क्रीम. कर्करोगाच्या रुग्णालाही बाहेरून औषध खरेदी करू न देणारी मेडिकल स्टोअर्स. तर दुसरीकडे कोणताही परवाना नसताना लाखोंच्या आयुर्वेदिक औषधांचं उत्पादन. महाराष्ट्रात अवघ्या तीन दिवसांत उघडकीस आलेल्या या प्रकारांनी अन्न व औषध प्रशासनालाही धक्का बसला आहे. ८ ते १० जुलैदरम्यान राज्यभर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे धडक कारवाई करत लाखो रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेतील सर्वाधिक मोठी कारवाई नांदेडमध्ये झाली आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धाड टाकल्यानंतर ‘अफराह कलेक्शन’ या दुकानात पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या ब्युटी क्रीमचा मोठा साठा आढळला. ‘गोरी’सह विविध ब्रँडची ही सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. संबंधित व्यापाऱ्याकडे खरेदीची वैध कागदपत्रे नसल्याने जवळपास ३९.७० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे कारवाई

पुण्यातील शुक्रवार पेठेतूनही आणखी धक्कादायक प्रकार समोर आला. कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर भस्म आणि रस औषधांचे उत्पादन व विक्री सुरू असल्याची माहिती FDAला मिळाली होती. छापा टाकल्यानंतर औषधांवर बॅच क्रमांक, उत्पादकाचे नाव, मुदत अशा अनिवार्य नोंदीच नसल्याचे आढळले. मालकीची कागदपत्रेही सादर करता आली नाहीत. त्यामुळे ५०.३६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

Maharashtra TimesDevendra Fadanvis : राज ठाकरेंचा हिंदीवरुन सवाल, सीएम फडणवीसांचं दोन संस्कृत शब्दांत उत्तर; विधानसभेत एकच हशा

बीड कारवाई

बीडमध्ये ‘मेरा रूप श्रृंगार क्रीम’ या उत्पादनावर त्वचा उजळणे, डाग कमी होणे अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळल्या. संबंधित उत्पादनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सोलापूर कारवाई

सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र कारवाईचा केंद्रबिंदू ठरले हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर्स. सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरमध्ये रुग्णांना तेथूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार खरी ठरली. तपासात प्रिस्क्रिप्शन न देणे, नियमबाह्य औषधविक्री, एक्सपायरी औषधांची अयोग्य साठवण यांसह अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने स्टोअरला स्टॉप अॅक्टिव्हिटीचे आदेश देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर कारवाई

छत्रपती संभाजीनगरमधील एका कर्करोगाच्या रुग्णाला केमोथेरपीसाठी आवश्यक इंजेक्शन बाहेरून खरेदी करण्यास मज्जाव केल्याचा प्रकारही समोर आला. त्यानंतर झालेल्या तपासणीत मेडिकल स्टोअरमध्ये अनेक गंभीर नियमभंग आढळल्याने संबंधित विक्री परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर अशा प्रकारच्या बिनपरवान्याच्या, बनावट किंवा दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या औषधे व सौंदर्यप्रसाधनांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. संशयास्पद उत्पादनांची माहिती नागरिकांनी जवळच्या FDA कार्यालयात देण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा