Headlines

thane municipal corporation buys new xuv700 cars for office bearers amid financial crunch ; पालिकेच्या तिजोरीत खडखडाट, ४०० कोटींचं कर्ज; तरीही पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर उधळपट्टी


Thane Municipal Corporation News : ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण असतानाही महापौर, उपमहापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांसाठी नव्या गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या खर्चावरून नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Thane Municipal Corporation News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नव्या कोऱ्या गाड्यांच्या खरेदीवरून सर्वस्तरांतून टीकेची झोड उठलेली असताना ठाण्यातही महापौर, उपमहापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी महागड्या गाड्यांच्या खरेदीचा ‘टॉप गिअर’ टाकण्यात आला आहे. एकीकडे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मोठ्या प्रकल्पांच्या निधीसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र तरीही लाखोंच्या गाड्यांवरील उधळपट्टी ‘सुसाट’ असून बुधवारी, गुरुपौर्णिमेच्या मूहूर्तावर यातील काही वाहने पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला हजर झाली आहेत.

ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासाठी महिंद्रा कंपनीच्या ‘एक्सयूव्ही ७००’ या नव्या गाड्या खरेदी करण्यात आल्या. या सर्वच वाहनांसाठी एकूण ६० ते ६२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासाठी टोयोटा इनोव्हा वाहन खरेदी करण्यात येणार आहे. ही गाडी अद्याप महापालिकेला प्राप्त झालेली नसून ती पुढील महिन्यात महापालिकेच्या ताफ्यात दाखल होत आहे. या वाहनासाठी अतिरिक्त २० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहेत. बुधवारी पालिका मुख्यालयात उपमहापौर व विरोधी पक्षनेत्यांची वाहने दाखल झाली. २०२१ साली अशाच प्रकारे पालिका पदाधिकाऱ्यांसाठी ७ नवीन वाहने खरेदी करण्यात आली होती. त्यासाठी जवळपास ७० लाख रुपये खर्च केले होते. आता या गाड्या पालिकेतील विविध पक्षांच्या गटनेते मंडळींना दिली जाणार असून या वाहनांचे चालक, त्यांचे वेतन तसेच इंधनाचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून होणार आहे.

उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांचे बैठकसत्र, पदाधिकाऱ्यांचा मात्र खर्च

ठाणे महानगरपालिकेच्या महसूल उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी सर्व विभागप्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागाने निश्चित महसूल उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करून परिणामकारक कामगिरी करावी, असे कडक निर्देश त्यांनी दिले. एकीकडे आयुक्त राव महसूलवाढीकरिता विभागप्रमुखांना कडक सूचना देत असताना सत्ताधारी – विरोधकांना अशा महागड्या गाड्यांवर उधळपट्टीची आवश्यकता आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा