Headlines

TET Paper Leak: पेपरफुटीचा वेताळ| Maharashtra Times


नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेचाही पेपर फुटल्याने सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांचे भविष्य पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे. भिवंडी पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला असला, तरी परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि निष्काळजीपणा पुन्हा अधोरेखित झाला आहे.

पेपरफुटीचा वेताळ
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटल्यानंतर एकीकडे तरुणाईचा संताप देशभरासह दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून आक्रमकपणे व्यक्त होत आहे. दुसरीकडे २८ जूनला महाराष्ट्रात १,०२८ केंद्रांवर होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) पेपर, परीक्षा सुरू होण्यापूर्वी २४ तास आधी फुटल्याचे उघड झाले. यामुळे सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांचे भविष्य पुन्हा एकदा अंधारात ढकलले गेले आहे. ही पेपरफुटी उघड झाली भिवंडीत. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून बिहारमधील राजीव शॉ, आकाशकुमार आणि हरियाणाच्या धीरज सिंग या तिघांना अटक केली. मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे, त्यावरून मोठे आंतरराज्य रॅकेट यामागे असणार, हे उघड आहे. आरोपींच्या कबुलीत हा पेपर तब्बल दीड कोटी रुपयांना विकला जाणार होता, असे उघड झाले; म्हणजे आरोपींना रोखले नसते तर टीईटीच्या परीक्षेत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाले असते, यात शंका नाही. आता फेरपरीक्षा तर होईलच, मुख्यमंत्र्यांनी विशेष तपास पथकही स्थापन केले आहे. आरोपींना ‘मकोका’ लावण्याची चर्चाही सुरू आहे; पण हे सगळे ‘बैल गेल्यावर मजबूत झोपा करण्याच्या’ बाता मारण्यासारखे आहे. नीट पेपरफुटीचे सावट देशभर असतानाच महाराष्ट्रात हा प्रकार घडावा, हे भयंकर दुर्दैवी आहे. राज्य सरकारने स्थानिक पातळीवर अधिक सावध राहणे गरजेचे होते, पण यंत्रणा गाफील राहिली. देशातील महत्त्वाच्या परीक्षा यंत्रणा जाग्या होऊन काही धडे घेतील आणि कडेकोट सुरक्षेत परीक्षा होतील, अशी अपेक्षा होती; पण परीक्षेच्या आधी आरोपी विमानप्रवास करून दिल्लीहून थेट ठाण्यापर्यंत तंतोतंत जुळणारा पेपर घेऊन पोहोचत असतील तर नेमकी कडक सुरक्षा कुठे आणि कशी लावली होती, असा प्रश्न पडतो. परीक्षा घेणारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि प्रश्नपत्रिका छापणाऱ्या केंद्रांवर सरकारचे कसलेही नियंत्रण नाही, हेच यातून स्पष्ट होते. त्यातही टीईटीबाबत हे पहिल्यांदाच घडलेले नाही! २०२०-२१ दरम्यान झालेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे पुणे पोलिसांच्या सायबर सेलने उघडकीस आणले होते. त्यावेळी लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आले होते. तरीही पुन्हा हे घडले, यातून राज्य परीक्षा परिषदेचे निर्ढावलेपण दिसते.

राज्यभरातून सहा लाखांहून अधिक उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. अनेक विद्यार्थी एसटी बस, रेल्वेने प्रवास करून परीक्षा केंद्र असलेल्या शहरांत पोहोचले होते. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा वाया गेलाच; पण एकूणच व्यवस्थेबद्दल तीव्र नैराश्य आणि चीड निर्माण झाली. आता फेरपरीक्षेची घोषणा झाली आहे. त्यात महिनाभराचा काळ जाईल, पुन्हा यंत्रणा कामाला लागेल. लोकांच्या करातून आलेला पैसा यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराची किंमत म्हणून मोजला जाईल. या घोटाळ्यावरून राज्यात विरोधक, विशेषतः काँग्रेस कमालीची आक्रमक झाली असून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनांचे सत्र सुरू झाले आहे. विधिमंडळांतही त्यावर वादळी चर्चा झाली. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणीही झाली. लाखो विद्यार्थ्यांची आयुष्यं पणाला लागलेल्या या परीक्षांमधील घोटाळ्यांची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता ना केंद्र सरकारकडे दिसते आहे, ना राज्य सरकारकडे. नीट प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पद तर सोडाच, अद्याप मौनही सोडलेले नाही; आता राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे वेगळे पाऊल उचलून संवेदनशीलता दाखवतात का बघायचे.

नीट पेपरफुटी, सीबीएसईमधील गोंधळ, नागपूर विद्यापीठातील पेपरफुटी यानंतर आता टीईटी… एकूणच शिक्षण आणि शासकीय परीक्षा यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही भावी शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी असते. दीड कोटींचा पेपर विकत घेऊन ज्ञानदानाचे पवित्र काम करायला निघालेले हे भावी गुरुजन उद्या आपल्या देशाचे भविष्य घडवणार आहेत! असे शिक्षक शाळांमध्ये रुजू होतील तेव्हा ते पुढच्या पिढीच्या ओंजळीत नेमके काय दर्जाचे ज्ञानकण टाकतील आणि त्यांच्या हातून भावी पिढी कशी घडेल, हा निराश करणारा प्रश्न. या रॅकेटमध्ये परीक्षेचे पेपर दिल्लीहून ठाण्यात घेऊन येणारे या साखळीतले केवळ प्यादे असतील, त्यांचे सूत्रधार, त्यांच्यापर्यंत राज्यातून पोहोचलेले कुणीतरी ‘धंदेवाईक’ नक्कीच असेल. त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचतील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश मिळेल, ही आशा. या झाकोळात विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर पुन:पुन्हा बसणारा पेपरफुटीचा वेताळ दूर व्हावा अन् शिक्षणाचे अवकाश स्वच्छ…मुक्त व्हावे, ही अपेक्षा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा