मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्याची TET परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणामुळे लांबणीवर गेल्यानंतर आता केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा नेमकी कधी होणार, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्याची TET परीक्षा 28 जून रोजी होणार होती. मात्र पेपरफुटीच्या प्रकरणानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. दोन महिने उलटूनही नवीन परीक्षेची तारीख जाहीर झालेली नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम कायम आहे.
त्यातच आता 6 सप्टेंबर रोजी होणारी CTET परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) घेतला आहे. ज्या शिक्षकांना CTETसाठी नोंदणी करता आली नाही, त्यांना पुन्हा नोंदणीची संधी देण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
नोकरी टिकवण्यासाठी TET अनिवार्य
दरम्यान, शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होणे महत्त्वाचे ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संबंधित शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याने नोकरी टिकवण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी सांभाळत अनेक शिक्षक गेल्या काही महिन्यांपासून TET आणि CTET परीक्षेची तयारी करत आहेत. मात्र वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने त्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडत असून मानसिक तणावही वाढत असल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
‘परीक्षा कधी होणार?’ शिक्षकांचा सवाल
राज्याची TET परीक्षा कधी घेतली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसताना CTET परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याने शिक्षकांची चिंता आणखी वाढली आहे. परीक्षा द्यावीच लागणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी “परीक्षा नेमकी कधी होणार?” याचे स्पष्ट उत्तर मिळत नसल्याची नाराजी शिक्षकांमध्ये आहे.
CTETसाठी नोंदणी न करू शकलेल्या शिक्षकांना पुन्हा संधी देण्याच्या उद्देशाने CBSEने व्यापक विचार करून निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले, तरी परीक्षा देण्यासाठी तयारी करणाऱ्या शिक्षकांना या निर्णयामुळे पुन्हा नव्याने नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे TET आणि CTETच्या सुधारित तारखा लवकर जाहीर करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.
