Headlines

Supriya Sule Emotional Reaction on Two NCP Parties Merger Question


खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या प्रश्नावर भावनिक प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, अशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती. त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली /मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीगाठींवरुन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याचवेळी ‘वर्षा’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते, अशी चर्चा होती. या सर्व चर्चांनंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत कोणतीही बैठक झाली नव्हती, असं सुनील तटकरे वारंवार म्हणाले होते. पण आज झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती असं सुनील तटकरे यांनी मान्य केलं आहे.

सुनील तटकरे यांच्या वक्तव्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत आज जंतरमंतर मैदानात उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यामांना प्रतिक्रिया देताना विलीनीकरणाच्या प्रश्नावर भावनिक प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे विलीनीकरणाच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाल्या?

“माझा भाऊ आज राहिलेला नाही. त्यामुळे माझ्या भावाबद्दल आणि झालेल्या चर्चेबद्दल याला आता पूर्णविराम दिला आहे. माझा भाऊ जावून पाच महिने झाले आहेत. आम्ही कुटुंब म्हणून कुठेतरी सावरतोय. माझ्या भावाची जी शेवटची इच्छा होती की, दोन्ही पक्ष एकत्र येवून गुण्यागोविंदाने सर्वांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी. माझ्या भावाची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा अजितदादा असतानाही होती आणि अजित दादा गेल्यावरही होती. पण आता तशी काही भावना त्या बाजूने येत नाहीय. त्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या गोष्टीला आम्ही पूर्णविराम दिला”, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

‘ते ऐकून आम्हाला दु:ख झालं’

“ज्या दिवशी अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर आमच्या काही नेत्यांनी अजितदादांची शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी समोरच्या पक्षाच्या नेत्यांनी अशी काही चर्चा झालीच नाही, असं मत मांडलं. हे ऐकून आम्हाला प्रचंड दु:ख आणि वेदना झाल्या होत्या”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले’

“एकतर माझा भाऊ गेला होता आणि त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न होते. कारण तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता. त्यामुळे आमच्याकडून तो विषय त्याचदिवशी संपवला. आम्ही स्वाभिमानी लोकं आहोत. आमचा भाऊ आज राहिला नाही. त्यामुळे ठिक आहे. मला ज्या दिवशी लक्षात आलं की, अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यास समोरचे नेते रास्त नाहीत. मी पूर्णविराम दिला. त्यानंतर आम्ही राज्य आणि देशाच्या सेवेसाठी लागलो आहोत”, अशी भावनिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.