Headlines

Supriya sule clarification on meeting between jayant patil and cm devendra fadnavis; जयंतरावांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक, पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार? सुप्रिया सुळेंकडून एक घाव दोन तुकडे


NCP BJP News: जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चांनी जोर धरला होता.

supriya sule
जयंतरावांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक, पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार? सुप्रिया सुळेंकडून एक घाव दोन तुकडे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी काल रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील वर्षा बंगल्यावर उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादीही महायुतीसोबत सत्तेत सहभागी होणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला असून पक्षाची बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमच्या पक्षाबाबत आज विविध प्रसारमाध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने काही बातम्या आल्या आहेत. मात्र पक्षाकडून कोणीही अधिकृतपणे भूमिका मांडलेली नाही. या बातम्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत आमच्या सहकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये समज-गैरसमज निर्माण होऊ शकतो, यासाठी मी ही पत्रकार परिषद घेत आहे. इथं येण्याआधी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस अध्यक्षांसह काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांच्याशीही चर्चा केली आहे. तसंच आमच्या पक्षाच्या आमदार-खासदारांसोबतही चर्चा केली आहे. एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने, खासदाराने किंवा आमदाराने भूमिका मांडलेली नसताना सूत्रांच्या हवाल्याने बातम्या दिल्या जात आहेत. आमच्या पक्षाकडे ईडी, सीबीआय किंवा आयकर विभाग यासारख्या गोष्टी नसल्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी केली जात आहे,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना का भेटले?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्यानेच अर्थमंत्रिपदाबाबत चर्चा करण्यासाठी काल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतल्याची चर्चा रंगत होती. यावरही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “जयंत पाटील हे अधिकृतपणे मुख्यमंत्र्‍यांची वेळ घेऊन त्यांना भेटले आहेत. ते कुठेही हुडी वगैरे घालून भेटायला गेले नव्हते. ते पुढच्या दाराने मुख्यमंत्र्यांना भेटले आणि पुढच्या दारानेच बाहेर पडले. ईश्वरपूर तालुक्यातील नगराध्यक्षांवर अचानक अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. या भेटीवेळी तिथं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघे होते की नाही, याची मला कल्पना नाही. त्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे,” असं मत सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेबाबत पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय?

केंद्र सरकार आणू पाहात असलेलया मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “याआधी सरकारने जे बिल आणलं होतं, ते आम्हाला मान्य नव्हतं. त्यामुळे आम्ही त्या बिलाविरोधात भूमिका घेतली आणि या बिलात काही दुरुस्त्या करून तो प्रस्ताव आम्हाला पुन्हा पाठवा, असं आम्ही सरकारला सुचवलं होतं. मात्र हा नवा प्रस्ताव अद्याप आमच्यासमोर आलेला नाही. हा प्रस्ताव आल्यानंतर इंडिया आघाडीतील घटकपक्षांसोबतच चर्चा करून आम्ही आमची भूमिका जाहीर करू,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा