Headlines

Eknath Shinde Reaction on Maharashtra Chief Minister Post


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला. शिवसेनेच्या नेते आणि मंत्र्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे, असं पत्रकारांनी शिंदेंना सांगत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मिश्किल सवाल केला.

Eknath Shinde
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली/मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाबाबत सातत्याने चर्चा होत आली आहे. शिवसेना फुटीनंतर 2022 मध्ये सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं. पण भाजपच्या दिल्लीतील हायकमांडने दिलेल्या सूचनेनुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्रीपदावर दावा केला होता. पण भाजपने आपल्याकडे मुख्यमंत्रीपद घेतलं. यावरुन एकनाथ शिंदे काही दिवस नाराज होते. पण नंतर आपण नाराज नसल्याचं शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्ट केलं होतं.

आगामी 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी मोठ्या घडामोडी घडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण राहणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नावदेखील चर्चेत आहे. पण मग देवेंद्र फडणवीस 2029 मध्ये दिल्लीत गेले तर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

एकनाथ शिंदे यांचा मिश्किल सवाल

या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना दिल्ली दौऱ्यावेळी पत्रकारांनी आपण मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं सांगितलं आणि त्यावर मत विचारलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मिश्किल सवाल केला. “आता व्हॅकेन्सी आहे का?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर केला.

मुख्यमंत्रीपदाबाबत शिंदे आणखी काय म्हणाले?

“प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. मी मुख्यमंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं वाटायचं. हे साहजिक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण शेवटी आमचा अजेंडा मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवणं नाहीय. आमचा अजेंडा या महाराष्ट्राच्या जनेताला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, असा आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

“आमची विचारधारांची युती झालेली आहे. ही वैचारिक युती आहे. आम्ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. त्यामुळे आम्ही कधीही महायुतीत मला काय मिळेल? तुला काय मिळेल? अशाप्रकारची वृत्ती आमची नाही. आम्ही काम करणारे लोकं आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या मिश्किल वक्तव्याला महत्त्व का?

एकनाथ शिंदे हे मंगळवारी संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच इतर राजकीय घडामोडींवरही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत ‘आता व्हॅकेन्सी आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करण्याला देखील महत्त्व असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

दत्तात्रय भरणे यांचं फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य

दुसरीकडे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असं दत्तात्रय भरणे म्हणाले. “हा महाराष्ट्र खूप दिवसांपासून दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे. 25 तारखेला आषाढी आहे. आपण पांढुरंगाला एकच साकडं घालुया. योग्यवेळी आमच्या जेवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी शेतकऱ्यांच्यावतीने विनंती करतो”, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा