Success Story on Indian Hotelier: सरकारी लिपिक परीक्षेत नापास झालेल्या मोहन सिंग ओबेरॉय यांनी कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने ओबेरॉय ग्रुपची स्थापना केली. अवघ्या 40 रुपये पगारावर नोकरी करणाऱ्या ओबेरॉय यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि भारतातील आलिशान आतिथ्य क्षेत्रात एक विशाल साम्राज्य उभारले, ज्याचे व्यवस्थापन आता त्यांची चौथी पिढी करत आहे.

देशातील दुसरा सर्वात मोठा हॉटेल ब्रँड
मोहन सिंग ओबेरॉय यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. सर्वसामान्यांमध्ये कदाचित हे नाव इतकं प्रचलित नसेल पण, उद्योग विश्वात त्यांची ख्याती देशातच नव्हे तर विदेशातही पसरली आहे. भारतातील हॉटेल उद्योगाचे प्रणेते मानले जाणारे मोहन सिंग ओबेरॉय यांनी टाटांच्या नंतर भारतातील दुसऱ्या मोठ्या ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सची स्थापना केली. ओबेरॉय ग्रुपची भारत, इंडोनेशिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस आणि सौदी अरेबियामध्ये 31 हॉटेल्स आहेत.
हॉटेल उद्योगाचे प्रणेते मानले
ओबेरॉय आणि ट्रायडेंट सारखी हॉटेल्स स्थापन करून मोहन सिंग ओबेरॉय यांनी भारतीय हॉस्पिटॅलिटी उद्योगाला जागतिक ओळख मिळवून दिली. EIH लिमिटेड आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेड या दोन सूचीबद्ध ओबेरॉय ग्रुपच्या कंपन्या असून त्यांचे एकत्रित बाजार भांडवल अंदाजे 25,000 कोटी रुपये आहे. एका सामान्य लिपिकापासून ते भारतीय हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा आधारस्तंभ बनण्यापर्यंत मोहन सिंग ओबेरॉय यांचा प्रवास खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
लिपिका परीक्षेत नापास
कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठं अपयश हेच यशाची महत्त्वाची पायरी ठरते. ओबेरॉय ग्रुपचे संस्थापक मोहन सिंग ओबेरॉय यांचा प्रवास याचं उत्तम उदाहरण आहे. अविभाजित पंजाबमधील (आताचे पाकिस्तान) एका लहानशा गावात जन्मलेल्या मोहन सिंग यांच्या डोक्यावरून वयाच्या फक्त सहाव्या महिन्यातच वडिलांचं छत्र हरपलं. 1922 मध्ये प्लेगच्या साथीनंतर सरकारी लिपिकाची परीक्षा देण्यासाठी फक्त 25 रुपये घेऊन शिमला येथे आले. मात्र, नशिबाने वेगळाच डाव साधला आणि परीक्षेत नापास झाले. (प्रातिनिधिक फोटो)
नवनवीन काम शिकण्याचा उत्साह
मोहन सिंग यांनी रावळपिंडी येथे आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर पदवी शिक्षणासाठी लाहोरला गेले. मग चांगल्या संधीच्या शोधात शिमला येथे स्थायिक झाले. आपल्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये नोकरी केली आणि मेहनत, उत्साह आणि तल्लख बुद्धीने हॉटेलच्या ब्रिटिश व्यवस्थापकावर खोलवर छाप पाडली. मोहन सिंग नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यास उत्सुक असायचे, आणि आपल्या डेस्क क्लर्कच्या कामाच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त कामे व नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराचे.
नेहरूंची 100 रुपये टीप अन् पहिले हॉटेल
नोकरीची नितांत गरज असल्याने मोहन सिंग त्यावेळी शिमला येथील प्रसिद्ध हॉटेल सेसिलमध्ये गेले, आणि तिथे त्यांना 40 रुपये दरमहा पगारावर वॉटर हीटरसाठी कोळशाची पोती तोलण्याचे काम मिळाले. मेहनती आणि प्रामाणिकपणामुळे लवकरच त्यांना बिलिंग क्लर्कच्या पदापर्यंत बढती मिळाली. या दरम्यान, हॉटेलमध्ये थांबलेल्या पंडित मोतीलाल नेहरूंसाठी रात्रभर जागून महत्त्वाचा अहवाल टाईप केल्याबद्दल त्यांना 100 रुपयांची टीप मिळाली ज्याने त्यांना पुन्हा धैर्य दिले.
महामारी अन् युद्धाचे संधीत रूपांतर
हॉटेल खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने आणि आपली सर्व मालमत्ता गहाण ठेवली. चार वर्षांनंतर, त्यांनी कलकत्त्यातील ग्रँड हॉटेल भाड्याने घेतले. 1938 मध्ये कॉलराच्या साथीमुळे कोलकातामधील 500 खोल्यांच्या ग्रँड हॉटेलला टाळं लागलं. परिस्थिती गंभीर होती, पण ओबेरॉय यांनी धोका पत्करून मालमत्ता अत्यंत कमी दरात भाड्याने घेतली आणि लवकरच एका फायदेशीर व्यवसायात रूपांतर केले. त्यानंतर, दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश लष्करी जवानांना निवास आणि अन्न पुरवून त्यांनी आपली प्रतिष्ठा व महत्त्व आणखी वाढवलं. या योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना ‘राय बहादूर’ या उपाधीने सन्मानित केले.
1943 मध्ये ‘असोसिएटेड हॉटेल्स ऑफ इंडिया’ विकत घेऊन देशातील सर्वात मोठी हॉटेल साखळी चालवणारे पहिले भारतीय ठरले. विशेष म्हणजे, त्यांनी डी. डब्ल्यू. ग्रोव्ह यांनाच कामावर ठेवले, ज्यांनी सेसिल हॉटेलमध्ये कोळसा तोलण्याचे पहिले काम दिलेले आणि दरमहा 1500 रुपये वेतन दिले.
राजकारणापासून पद्मभूषणपर्यंत
व्यावसायिक भरभराट करण्यासोबतच त्यांनी 1960 आणि 1970 च्या दशकात राज्यसभा व लोकसभा या दोन्ही संभागृहांमध्ये खासदार म्हणून काम केले. 1965 मध्ये त्यांनी ओबेरॉय इंटरकॉन्टिनेंटल सुरू करून देशातील पहिले आधुनिक पंच-तारांकित हॉटेल सुरू केले. 3 मे 2002 रोजी वयाच्या 103 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन सिंग ओबेरॉय यांना 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, पृथ्वीराज सिंग (बिकी) ओबेरॉय यांनी वारसा सांभाळला तर, आता त्यांची चौथी पिढी (विक्रम आणि अर्जुन ओबेरॉय) हा मल्टीनॅशनल चालवत आहे.

