Headlines

Spain Ceuta Migration: 24 तासांत 60000 स्थलांतरित समुद्रमार्गे पोहत पोहोचले; सीमेवर अनागोंदी, सैन्य तैनात, आणीबाणी घोषित


Spain Ceuta Migration: गेल्या २४ तासांत तब्बल ६० हजार जणांनी स्थलांतर करत समुद्र मार्गानं घुसखोरी केली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली आहे.

spain crisis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
माद्रिद: भौगोलिकदृष्ट्या उत्तर आफ्रिकेत असलेल्या पण प्रत्यक्षात स्पेनचा भाग असलेल्या सेऊटा शहरात प्रचंड मोठी घुसखोरी झाली आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभरात मोरक्को देशातून तब्बल ६० हजार जणांनी सीमा ओलांडून सेऊटामध्ये प्रवेश केला. समुद्रातून पोहत येत मोरक्कोतील हजारो जणांनी सेऊटा गाठलं. या सगळ्यात ४१ जणांचा बळी गेला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर स्पेन सरकारनंतर सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

मोरक्कोतील तब्बल ४९ हजार लोकांनी स्पेनच्या सेऊटामध्ये शिरकाव करण्यास जुलैच्या अखेरीच्या आठवड्यापासून सुरुवात केली. तराजल बॅकवॉटरच्या जवळ असलेल्या समुद्रात उतरून हजारो लोकांनी पोहत पोहत सेऊटाचा किनारा गाठला. बऱ्याच जणांनी टायर ट्युबचा वापर केला. काहींनी किनारी भागातून पायपीट करत सेऊटा गाठलं. अनेक ठिकाणी तारांचं कुंपण तोडून सेऊटामध्ये प्रवेश करण्यात आला. विस्थापितांचा लोंढा प्रचंड प्रमाणात समुद्र मार्गानं आल्यानं सीमेवर तैनात असलेले सिव्हिल गार्ड लाचार दिसले. सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्यानं हजारो विस्थापतांना रोखणं त्यांना अवघड गेलं.
Maharashtra TimesPakistan News: कॉकरोच एकत्र आले तर प्रचंड उलथापालथ होईल! पाकिस्तानात झुरळांची भीती; ट्रॉफीचोर गृहमंत्री घाबरले
या सगळ्यात चेंगराचेंगरी झाली. समुद्र मार्गे सेऊटाला येत असताना ४१ जणांचा मृत्यू झाला. हजारो विस्तापितांचा लोंढा आल्यानं सेऊटा शहरात अराजक माजलं आहे. स्थानिक रिसेप्शन केंद्रात क्षमतेपेक्षा कैक पट अधिक गर्दी जमली आहे. हजारो प्रवासी बागांमध्ये, पदपथांवर, रस्त्यांवर झोपले आहेत.

विस्थापतांचे लोंढे का आले?
या अभूतपूर्व संकटामागील एक प्रमुख कारण कायदेशीर बदल आहे. सागरी मार्गानं सेऊटा किंवा मेलिलामध्ये पोहोचलेल्या प्रवाशांना माघारी धाडण्याची प्रक्रिया तातडीनं केली जाणार नाही, असा निकाल स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. तात्काळ माघारी धाडण्याऐवजी या प्रवाशांना सामान्य इमिग्रेशन प्रक्रियेतून जावं लागेल, असं न्यायालयानं निकालात म्हटलं.
Maharashtra TimesPakistan News: कराचीत ‘धुरंधर’ गँगवॉरची पुनरावृत्ती? गँगस्टर बलोचच्या भावावर बेछूट गोळीबार; ल्यारी हादरलं
स्पेनच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मानवी तस्करी करणाऱ्या टोळींनी न्यायालयाच्या निकालाचा फायदा उचलला. सागरी मार्गानं सेऊटा गाठल्यास तातडीनं माघारी धाडलं जाणार नाही, असा विश्वास मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी मोरोक्कोतील हजारो लोकांना दिला. यानंतर मोरोक्कोतील हजारो नागरिकांनी सेऊटाची वाट धरली. त्यासाठी आयुष्य धोक्यात घालत सागरी मार्गानं प्रवास केला. हजारो जण पोहत पोहत सेऊटाला पोहोचले.

या संकटाचा सामना करण्यासाठी स्पेन सरकार आणि स्थानिक प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी आणि शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सैन्य तैनात करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा