Headlines

Snake Rescue Operation | वाघोशीत घरात आढळला दुर्मिळ ‘काळतोंड्या’ साप; सर्पमित्रांनी दिले जीवदान


Snake Rescue Operation -फलटण तालुक्यातील वाघोशी येथे एका घरात साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळताच नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण या संस्थेचे प्रतिनिधी धीरज भोसले यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता हा साप दुर्मिळ ‘काळतोंड्या’ (Dumeril’s Snake) Blackheaded असल्याचे स्पष्ट झाले.

या सापाला कोणतीही इजा होऊ न देता सुरक्षितपणे त्यालापकडण्यात आले. संस्थेकडे त्याची नोंद केल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. काळतोंड्या किंवा कृष्णशीर्ष सापाचे वैज्ञानिक नाव Sibynophis subpunctatus असून तो पूर्णपणे बिनविषारी आहे. हा साप लाजाळू व शांत स्वभावाचा असून शरीराचा रंग फिकट तपकिरी, चॉकलेटी किंवा करडा असतो. त्याचे काळ्या रंगाचे डोके हे त्याचे प्रमुख ओळखचिन्ह आहे. काही विषारी सापांशी साधर्म्य असल्याने या सापाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. हा साप प्रामुख्याने ओलसर भागात, पालापाचोळा, दगड किंवा लाकडांच्या खाली तसेच मातीमध्ये आढळतो.

संध्याकाळी आणि रात्री तो अधिकसक्रिय असतो. लहान कीटक, गांडुळे, पाली, सरडे आणि सापसुरळ्या यांसारखे जीव तो खातो. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेतील अन्नसाखळी व नैसर्गिक संतुलन राखण्यात त्याची महत्वाची भूमिका आहे.

घरात किंवा लोकवस्तीच्या परिसरात साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच सापाला मारू नये किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्र, बन विभाग किंवा अधिकृत वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत