Headlines

Sharad pawar ncp to join mahayuti bjp vinod tawde and jayant patil meeting political earthquake in Maharashtra; शरद पवारांच्या गोटात वेगवान हालचाली; पाटील-तावडे बैठक, महायुतीत सहभागी होणार? राज्यात दुसरा राजकीय भूकंप


NCP News: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी झाल्यास सतत भाजपविरोधात भूमिका घेणारे आमदार रोहित पवार नक्की काय करणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

sharad pawar ncp
शरद पवारांच्या गोटात वेगवान हालचाली; पाटील-तावडे बैठक, महायुतीत सहभागी होणार?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: राज्याच्या राजकारणातील अस्थिरता थांबण्याचं नाव घेत नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यानंतर आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्ताधारी महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तसंच सत्तेत सहभागी झाल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला काय येणार, याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांची भाजपचे नेते व खासदार विनोद तावडे यांच्यासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊन शरद पवारांचा पक्ष महायुतीत सहभागी होईल, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून रंगत होती. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे हयात असताना दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी जाहीरपणे केला आहे. मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या प्रक्रियेला खिळ बसली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा विलीनीकरणाला विरोध असल्याने तूर्तास तरी दोन्ही पक्ष एकत्र येणं शक्य नसल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने थेट घटकपक्ष म्हणून महायुतीत जाण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून यादृष्टीनेच चर्चा करण्यासाठी जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात मुंबईत काही दिवसांपूर्वी एक मॅरेथॉन बैठक झाल्याचे समजते.

कसं असू शकतं नवं समीकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला लोकसभेत बहुमत असलं तरी काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारला दोन तृतीयांश खासदारांची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने आणलेलं महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संख्याबळाच्या अभावी मंजूर न झाल्याने भाजपने आता एनडीएतील खासदारांची संख्या वाढवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावल्याचं दिसत आहे. आधी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे खासदार फुटले, त्यानंतर महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. आता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात फुटीची चर्चा सुरू असून महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहेत. जयंत पाटील यांची भाजपच्या राज्य पातळीवरील एखाद्या नेत्याशी चर्चा न होता मागील काही वर्षांत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय झालेल्या विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्याने पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर नव्हे तर केंद्रीय स्तरावरून प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्यास पक्षाला केंद्रात एक कॅबिनट मंत्रिपद आणि महाराष्ट्रात तीन मंत्रि‍पदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये महत्त्वाचे समजले जाणाऱ्या अर्थखात्याचाही समावेश असू शकतो. कारण अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी तूर्तास मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवली आहे. जयंत पाटील यांच्यासाठीच हे मंत्रिपद राखून ठेवल्याने या खात्याची जबाबदारी अन्य कोणत्या नेत्यावर सोपवण्यात आली नसल्याचीही कुजबूज आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्तेतील सहभागाबाबत विविध चर्चा रंगत असल्या तरी पक्षाकडून अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणत्यानी नेत्याने भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात आणि पवारांचा पक्ष खरंच भाजपसोबत सत्तेत जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा