मी आता सुमारे दीड महिन्यांनंतर फिलिपिन्सवरून आपल्या देशात सुखरूप येऊन पोहोचलो आहे. ढगातला सात-आठ तासांचा ओलसर प्रवास बरा झाला असं म्हणता येईल. बऱ्याच दिवसांनी आपली जमीन पायांना लागली त्यामुळे गुदगुल्या झाल्या. देशप्रेम उचंबळून आलं. मी भारावलेल्या अवस्थेत पाय ओढत टॅक्सी स्टँडवर गेलो. टॅक्सीवाल्या बांधवांनी माझं जोरदार स्वागत केलं. कुणी हात ओढले. कुणी बॅगा ओढल्या. ते अत्यंत प्रेमानं बोलत होते. राष्ट्रभाषेत बोलणाऱ्या एका दोघांनी मिठ्याही मारल्या. सगळ्यांनाच मी परत आल्याचा आनंद झालेला दिसत होता. असं शुद्ध प्रेम जगात कुठेही दिसणार नाही असं मनात येऊन गेलं.
मी मुंबईत विमानतळापासून जवळ राहतो. विमान उडताना हात हलवून घरच्यांना टाटा, बाय बाय करता येईल इतक्या जवळ राहतो. पण टॅक्सीवाले घर खूप दूर आहे, असं म्हणू लागले. मी घराच्या दिशेने हातवारे करून त्यांना पत्ता समजावण्याचा प्रयत्न केला. धाक दाखवण्यासाठी शुद्ध मराठीतही बोललो. पण ते म्हणाले, ‘तुम्हाला उशीर झाला. आत्ता सगळं बदललं आहे.’ ते पुण्यापर्यंतचं थेट भाडं मागू लागले. गोंधळ उडाला. आपलं ऐन मुंबईतलं घर पुण्याला कसं गेलं असा प्रश्न पडला. शेवटी वाटाघाटी करून लोणावळ्यापर्यंतच भाडं दिलं आणि घरी सुखरूप पोहोचलो.
टॅक्सी ड्रायव्हर जरा जास्तच प्रेमळ होता. त्याने स्वतः बॅगा उतरवून दिल्या. ‘सांभाळून जा, काळजी घ्या’ म्हणाला. तो गेल्यावर वाईट वाटलं. तो काही बिहार, यूपीपर्यंतचं भाडं मागत नव्हता. तो फक्त पुण्यापर्यंतच भाडं मागत होता. आपलं चुकलं. आपण नीट वागलो नाही. माणुसकी धर्माला जागलो नाही. अशी रुखरुख मनाला लागून राहिली.
घरी पोहोचल्यावर खिडकी उघडून बाहेर डोकावून बघितलं. समोरच्या मोकळ्या जागेत कचरा तसाच होता. आता कचऱ्याचा ढीग मोठा झाला होता. वयात आला होता. उद्या कचऱ्याची टेकडी होईल. पाऊस पडेल. टेकडी हिरवीगार होईल. पक्षी गोळा होतील. माणसं हवा खायला आणि मुलं दंगा करायला टेकडीवर जमतील. टेकडीवर तरुणांचं प्रेम फुलेल असे विचार मनात येऊन गुदगुल्या झाल्या. आता कचऱ्याविषयी, कचरा टाकणाऱ्यांविषयी अतोनात प्रेम वाटू लागलं आहे.
मी शरीरानं भारतात पोहोचलो तरी अजूनही मनानं फिलिपिमध्येच रेंगाळतो आहे. आता तिथल्या काही आठवणी लिहून काढाव्यात असं वाटू लागलं आहे. तिथे घडलेल्या एक-दोन प्रसंगांवरून तिथली माणसं प्रांजळ असावीत असं माझं मत झालं आहे.
मी मनिलाला माझ्या मुलीकडे राहत होतो. एकदा संध्याकाळी गडबड झाली. अचानक वादळ आलं आणि वाऱ्याने घरातला एक दरवाजा बंद झाला. लॉक लागलं. लहान-मोठ्या चाव्या लॉकमध्ये खुपसून गरागरा फिरवल्या, चाव्या मोडल्या, पण दरवाजा हलला नाही. दाराला लाथा घातल्या. दरवाजा तोडावा असेही प्रयत्न झाले. पण उपयोग झाला नाही. आता काय करावं, असा प्रश्न पडला. कुणीतरी चाव्या बनवणाऱ्याचा फोन नंबर दिला. त्याला तत्काळ फोन केला. परिस्थिती समजावून सांगितली. त्याने ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला, ‘मला जमणार नाही, मी प्यायलो आहे.’ गयावया करूनही तो ऐकेना. जास्त पैसे देतो म्हणालो. पण तो बधला नाही. तो शेवटपर्यंत अभिमानाने ‘मी प्यायलो आहे’ असं म्हणत राहिला. हा प्रांजळपणा थक्क करणारा होता.
तिथल्या काही सज्जन लोकांबरोबर दारूवर गंभीर चर्चा झाली. ‘आम्ही भारतीय पाळण्यातूनच ग्राइप वॉटर पित मोठे झालो. आम्हाला पाळण्यातूनच दारूचं व्यसन लागलं’, हे सांगितल्यावर त्यांना स्वतःच्या मागासलेपणाची लाज वाटू लागली.
पूर्वी चमचाभर औषध घेऊन मुलं बरळत, लटपटत चालत, त्याचं खूप कौतुक होत असे. पण लटपटत, बरळणाऱ्या मोठ्यांची मात्र चेष्टा होत असे. गडकऱ्यांनी प्रौढ पिणाऱ्यांवर ‘एकच प्याला’ नावाचं नाटक रचलं होतं. आता मुलांसाठी ‘एकच चमचा’ नावाचं बालनाट्य लिहायला हवं असं वाटतं. असो!
इथले सगळेच लहान-थोर, गरीब-श्रीमंत चकचकीत गोरे दिसतात. शिवाय मेकअपही करतात. त्यांना गोऱ्या रंगाचं आकर्षण आहे. ते महागडी औषधं टोचून घेतात आणि गोऱ्यांपेक्षा जास्त गोरे होऊन जातात. तिथे लग्नापूर्वी दोन-चारदा भेटायची पद्धत आहे. एकदा स्विमिंग पूलवर जाण्याचाही आग्रह धरला जातो. हा एकत्र पोहण्याचा पवित्र विधी नव्यानेच सुरू झाल्याचं कळलं. ‘ते लग्नापूर्वी पोहत का असतील’, असा प्रश्न पडला. चौकशी केल्यावर कळली ती गोष्ट अशी- पाण्यात उतरलं की मेकअप वाहून जातो आणि खरा चेहरा समोर येतो. ते खरा चेहरा बघण्यासाठी पोहतात.
या पोहण्याच्या विधीमुळे लग्नसंस्था धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक लग्नं रखडली होती. रखडलेली लग्नं मोडली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. वॉटरप्रूफ मेकअप बाजारात आले आहेत. आता पाण्यात कितीही उलटसुलट डुबक्या मारल्या तरी मेकअप विरघळत नाही. वाहून जात नाही. उलट पाण्यात चेहरा चमकतो. माणसं सुंदर दिसू लागतात. प्रेम वाढतं. आता तिथे कुटुंब मोडण्याचं प्रमाण कमी झालं आहे असं म्हणतात.
तिथले लहान-थोर, गरीब-श्रीमंत चोवीस तास मोबाइलमध्ये गुंतलेले असतात. मान मोडून मोबाइलमध्ये बघत असतात. आपणही बघतो. काम असेल तर फोनवर बोलतो. कानावर आवाज पडला की बरं वाटतं. भेटल्याचं समाधान होतं. त्यांचं फक्त आवाजानं समाधान होत नाही. ते सतत व्हिडीओ कॉल करत असतात किंवा त्यांना व्हिडीओ कॉल येत असतात. रस्त्यावर चालताना, मोटरसायकल चालवताना ते व्हिडीओ कॉलवरच असतात. एकमेकांना बघत, बोलत राहतात. हे एकमेकांना बघत, बोलत राहण्यामागचं रहस्य कळत नव्हतं. चौकशी केल्यावर कळलं. ते प्रेमात असले तरी पटकन फारसा विश्वास ठेवत नाहीत. ते एकमेकांवर नजर ठेवण्यासाठी मोबाइलचा वापर करतात. आपल्याकडे असं अविश्वासाचं वातावरण नाही. आपल्याला रात्री उशीर होणार असेल तर फक्त ‘मित्र पडला. त्याला घेऊन हॉस्पिटलला आलोय-’ एवढी गोष्ट पुरते. तिथे हे चालत नाही. प्रत्यक्ष लंगडणारा मित्र, मोडलेला पाय, हॉस्पिटल हे सगळं मोबाइलवर दाखवावं लागतं. शेवटी मित्राने त्यांच्या तगालू भाषेत कण्हत, ‘नमस्कार वहिनी’ म्हटल्यावरच विश्वास बसतो. आपण सुखी आहोत. प्रेमापोटी पटकन विश्वास ठेवतो. या विश्वासानेच आपली लग्नव्यवस्था टिकवून ठेवली आहे.
तिथल्या लोकांची नावं विचित्र असतात. ते इंग्रजी महिन्यांची नावं ठेवतात. देशांची नावंही ठेवतात. इंडियन, चायना, अमेरिका, जपान नावांची माणसं भेटतात. इंडियन हे नाव खूप प्रसिद्ध आहे असं कळलं. अभिमान वाटला.
तिथे ऐन शहरात, गजबजलेल्या चौकात एक सुंदर हिरवीगार बाग होती. बागेत झाडं, पान-फुलं होती. बागेत मोठ्या वृक्षांच्या सावलीत, आरामखुर्चीत पडून, कॉफीचे घोट घेत पुस्तकं वाचणारे लोक दिसले. शेजारीच एक काचेचं सुंदर घर होतं. त्या घरात लोकांनी आणून ठेवलेली असंख्य पुस्तकं नीट मांडून ठेवलेली होती. कोणतंही पुस्तक उचलून, बाहेर बसून वाचायची सोय होती. मी एक पातळ, हलकं पुस्तक उचलून बाहेर बसलो. ती एक प्रेमकथा होती. मे नावाची मुलगी, ऑगस्ट नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडते. चायना, इंडियनच्या मदतीने कारस्थान रचतो. प्रेम असफल होतं.
असं काहीसं कथानक होतं. तास, दोन तास निवांत झाडाखाली बसून वाचल्याने ती गोष्टही आवडली. आनंद झाला. आपल्यालाही अशी पुस्तकांची बाग फुलवता येईल का, असं मनात येऊन गेलं. बागेतली पुस्तकं कोणी नेणार नाही, पण झाडं कापून नेतील, सावली पळवतील अशी भीती वाटते.

