Headlines

Savita Malpekar : ‘तो सीन करताना माझे पती आयसीयूमध्ये सिरीयस होते’, सविता मालपेकरांनी सांगितला ‘देऊळ बंद २’ सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग


Savita Malpekar On Deool Band 2 : सविता मालपेकर यांनी एका मुलाखतीमध्ये ‘देऊळ बंद २’ सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे.

Savita Malpekar On Deool Band 2
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सविता मालपेकर यांनी प्रवीण तरडे यांच्या ‘ देऊळ बंद २ ‘ सिनेमामध्ये काम केलं आहे. या सिनेमामध्ये मोहन जोशींनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. सिनेमात सविता मालपेकर रागाच्या भरात स्वामींना मारतात, असा सीन आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सविता मालपेकर यांनी या सीनच्या शूटिंगदरम्यानचा प्रसंग सांगितला आहे.

सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग

मुलाखतीदरम्यान सविता मालपेकर म्हणाल्या की, ‘तो सीन करताना माझे पती आयसीयूमध्ये सिरीयस होते. याबद्दल मोहन जोशींना आणि प्रवीणला काहीच माहित नव्हतं. पण, आधी जेव्हा कथा वाचून दाखवली जाते, त्यावेळी मला प्रवीणने त्या सीनबद्दल सांगितलेलं. पण, सीन शूट करताना मी स्वामींची माफी मागितलेली. त्यांना मी म्हटलं, हे माझं काम आहे आणि तुम्हीच सांगितलंय काम सगळ्यात श्रेष्ठ असतं. त्यामुळे मी तो सीन करणार आहे. त्यानंतर मी तो सीन केला.’

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

‘आपल्या आयुष्यात काही वाईट घडलं तर आपण देवसोबत भांडतो. सिनेमामध्ये तर दिवसरात्र स्वामी-स्वामी करणारा तिचा मुलगा जीव देतो त्या स्त्रीची तडफड सीनमध्ये दाखवण्यात आली आहे.’ असं सविता यांनी पुढे सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविता मालपेकर बोलत होत्या.

Maharashtra TimesManisha Koirala : ‘एकटेपणा जाणवायचा, आता मी मरणार आहे असं वाटायचं’, मनीषा कोईरालानं सांगितला कॅन्सरचा कठीण काळ
याच मुलाखतीदरम्यान सविता यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला होता. सविता म्हणाल्या की, ‘मी काम सुरू करण्यापूर्वी प्रवीणबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. तो सेटवर खूप शिव्या देतो, तोंडावर स्पष्ट बोलतो, असं लोक म्हणायचे. मला हे सगळं मान्यही आहे. पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की, तो एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पना असतात. त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट केले आहेत आणि स्वतःसाठी मोठी स्वप्नं पाहिली आहेत. दिग्दर्शक म्हणून प्रवीणच्या डोक्यात एकच गोष्ट असते की, निर्मात्याने चित्रपटावर आपले पैसे लावले आहेत. त्यामुळे काम चोख झालं पाहिजे. त्यामुळे तो कधी कधी रागावतो. पण, त्याचा तो राग फक्त कामापुरता मर्यादित असतो. सीन संपताच तो तितक्याच प्रेमानं जवळ घेतो, कौतुकही करतो.’