Headlines

Satpuda Fire Incident: सातपुड्यात वणव्याचे तांडव; तीन वर्षांचा ‘ग्रीन पॅटर्न’ खाक, सीमावर्ती भागाला उष्णतेचा तडाखा


Satpuda Fire Incident: वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील पालापाचोळा आणि कोरडी झुडपे एकमेकांवर घासून नैसर्गिकरित्या ठिणगी पडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे.

satpuda fire incident
सातपुडा पर्वतरांगा वणवा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या सोबतीने शांत असलेला दक्षिण सातपुडा सध्या वणव्याच्या विळख्यात सापडला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या या पर्वतरांगांमध्ये भीषण आग लागली आहे. गेल्या तीन वर्षांतील वनविभागाची तपश्चर्या अवघ्या काही तासांत खाक झाली आहे. या वणव्यामुळे केवळ वनसंपत्तीच नव्हे, तर सीमावर्ती भागातील मानवी वस्त्यांनाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे.

सातपुडा पर्वतरांगांमधील अंबाडोरी, खोकरा, गारगोटी, सालबर्डी आणि गामुख या दुर्गम पट्ट्यात आगीने रौद्ररूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, मागील तीन वर्षे या भागात एकही वणवा लागला नव्हता. वनविभागाच्या या कामगिरीबद्दल शासनाकडून स्थानिक ग्रामस्थांना प्रोत्साहनपर पुरस्कारही देण्यात आले होते. मात्र, यंदा ही परंपरा खंडित झाली असून आगीच्या संकटामुळे वनविभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा तापमानाने ४७ अंशांचा टप्पा ओलांडला आहे.

Maharashtra TimesJellyfish Warning Alibaug : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर जाताय तर सावधान! निळाशार ‘ब्लू बटन’चा सापळा, अलिबागमध्ये पर्यटकांना सतर्कतेचा इशारा
यंत्रणेची कसोटी
सध्या ही आग शेकडो हेक्टर वनक्षेत्रात पसरली असून, विशेषत: अंबाडोरी आणि सालबर्डी वनपरिक्षेत्रातील वन खंडात मौल्यवान लाकूड धोक्यात आले आहे. आग विझवण्यासाठी दीडशेहून अधिक वनमजूर दुर्गम भागात तैनात आहेत. वीसपेक्षा जास्त ब्लोअर मशीन आणि स्थानिक साहित्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांचे वनाधिकारी आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक यांची तातडीची बैठक पार पडली. आंतरराष्ट्रीय तस्करी रोखणे आणि वणवा विझविणे हे दुहेरी आव्हान प्रशासनासमोर असून, लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणी वनमंत्र्यांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

नागरिकांचे हाल
वणव्याच्या आगीमुळे सीमेवरील गावांमध्ये गरम वारे वाहू लागले आहेत. या वाऱ्यांमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. ही आग लवकर आटोक्यात न आल्यास दुर्मीळ वनौषधी आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वारा, डोंगराळ भाग ठरतोय अडथळा
डोंगराचा दुर्गम भाग आणि सातत्याने वाहणारे उष्ण वारे यामुळे आग विझविण्याच्या मोहिमेत मोठा अडथळा येत आहे. एका बाजूला आग विझविली, की वाऱ्याच्या झोतामुळे दुसऱ्या बाजूला ठिणग्या पडून नवीन वणवा पेटत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे वन कर्मचारी, वनरक्षक आणि निसर्गप्रेमी वनमित्र वणवा विझविण्यासाठी झटत आहेत. मध्य प्रदेशातील यंत्रणाही या लढ्यात खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा