कागल – कागल ते सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम होत असून उपकंत्राटदारांसह त्यांना नेमणाऱ्यांनाही काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कागल परिसरातील महामार्ग, हेम योजनेअंतर्गत रस्ते, सिमेंट काँक्रीटीकरण तसेच विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.
यावेळी महामार्ग सहापदरीकरणामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी, सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा, पुलांची उंची, पाणीपुरवठा वितरणातील समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याच्या तक्रारीही बैठकीत मांडण्यात आल्या.
या पार्श्वभूमीवर दोषी उपकंत्राटदारांविरोधात तातडीने कारवाई करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. तसेच सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी कागल नगरपालिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
