Headlines

Sangli Crime | वृद्धांना ‘लिफ्ट’ देण्याचा बहाणा… निर्जनस्थळी नेऊन दागिने लुटणारा चोरटा जेरबंद!


सांगली : मोटरसायकलवरून सोडण्याचा बहाणा करून वृद्ध महिला व पुरुषांना निर्जनस्थळी नेणे, तसेच वृद्धांना दारू पाजून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मारुती बयाजी कोटे (रा. हुलजंती, ता. मंगळवेढा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून १३ लाख ३५ हजार रुपयेचे सोन्याचे दागिने आणि एक मोटरसायकल असा सुमारे १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत कोटे याने मिरज ग्रामीण, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या आठ गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेळंकी येथे १६ ऑगस्ट रोजी किराणा दुकानासमोर थांबलेल्या एका महिलेला बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवून पुन्हा घरी सोडतो, असा बहाणा करून संशयिताने मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर अज्ञातस्थळी नेऊन तिच्या गळ्यातीलसोन्याचे दागिने लुटून त्याने पलायन केले होते. या घटनेनंतर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेसह वृद्धांना लक्ष्य करून लुटमारीच्या घटना घडत असल्याने पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

पथकाला कुपवाड येथील चाणक्य चौक परिसरात एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कोटेला ताब्यात घेतले. त्याने बेळंकी येथील महिलेचे दागिने लुटल्याची कबुली दिली. त्यानंतर चौकशी केली असता त्याने अन्य सात गुन्ह्यांचीडी कबुली दिल्याचे तपासात समोर आले.

कोटे याने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, जत येथे तीन, कवठेमहांकाळ येथे एक आणि आटपाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, असे एकूण आठ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत