Headlines

Sachin Ahir Shiv Sena UBT Leader joins Eknath Shinde for Vidhan Parishad Deputy Chairman Election; ठाकरेंना सर्वात मोठा हादरा, सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडलं, थेट विधान परिषद उपसभापतीपदाचं तिकीट, वरळीत राजकीय भूकंप


Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 : उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत असतानाच त्यांच्या सुपुत्राच्या वरळी मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

Sachin Ahir Shiv Sena Vidhan Parishad Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सचिन अहिर हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते मानले जात असत. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात सचिन अहिर यांचा मोलाचा वाटा होता. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत सहा खासदार ठाकरेंचं शिवबंधन सोडून शिवसेनेत गेले असतानाच आता सचिन अहिर यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाला मोठं भगदाड पडलं आहे. उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत असतानाच त्यांच्या सुपुत्राच्या मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

कोण आहेत सचिन अहिर?

सचिन अहिर यांनी १९९३ मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघात आपल्या कामाला सुरुवात केली. सचिवपद भूषवल्यानंतर ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९९६ पासून ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचेही प्रमुख राहिले. त्यांनी माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा युनियन इत्यादींचेही नेतृत्व केले होते. या सर्व उद्योगांमधील कामगारांच्या पगारात वाढ करण्यासाठी करार घडवून आणून त्यांनी कामगार चळवळीवर प्रभाव टाकला. सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नीने श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली होती. वरळी फेस्टिव्हल आणि दहीहंडीच्या काळात ते भव्य स्पर्धा आयोजित करत असत.

VIDEO | ‘उद्धव ठाकरे बांडगुळासारखे आहेत का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा’

राष्ट्रवादीकडून तीनदा आमदार, गृहनिर्माण राज्यमंत्री

१९९९ मध्ये सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. पुढे २००४ आणि २००९ मध्येही त्यांनी आमदारकी राखली. २००९ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांची गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. ते राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपदही भूषवत होते. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला. त्यांनी एकसंध शिवसेनेत प्रवेश केला.

Sachin Ahir Shiv Sena Vidhan Parishad  Maharashtra Times (1)
सचिन अहिर विधान परिषद उपसभापती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना

Maharashtra TimesSiya Goyal : बारावीत फेल, सियाला अभ्यासात रसच नव्हता, आई पूजा गोयलची माहिती; चेतनसोबतच्या अफेअरवरही मोठा खुलासा
वरळी हा सचिन अहिर यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे २०१९ आणि २०२४ मध्ये आदित्य ठाकरे यांना विधानसभेवर निवडून आणण्यात सचिन अहिर यांचा महत्त्वाचा सहभाग मानला जातो. २०२० मध्ये शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांच्यावर पुणे संपर्क प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली होती. आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघाचे मैदान मोकळं केल्याची बक्षिसी म्हणून २०२२ मध्ये ठाकरेंकडून त्यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली.
Maharashtra TimesPabe Ghat Accident : जेवणाचं दुपारी कॉल करुन सांगतो, विश्वासचा आईला फोन ठरला अखेरचा, कुटुंबाने शेंडेफळ गमावलं, पहाटे साडेतीनला काळीज चिरणारी बातमी
सचिन अहिर यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा काळ २०२८ पर्यंत आहे. परंतु बदलती राजकीय परिस्थिती पाहता त्यापुढील वाटचालीचा विचार करुन सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. आता यावर उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा