Russia Fuel-Oil Shortage: भारत आणि अमेरिका यांच्यात स्वस्त रशियन तेलासाठी तीव्र संघर्ष सुरू असताना भारताच्या मित्राला आपल्याच देशात इंधन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इंधन तुटवड्याची पुष्टी केली असून त्यांच्या पेट्रोलचा साठा केवळ 1.6 दशलक्ष मेट्रिक टन इतका कमी झाला असून रशियाने आता भारत आणि कझाकस्तानकडे मदत मागितली आहे.

रशियामध्ये मोठे ऊर्जा संकट
रशियाकडे 80 अब्ज बॅरल तेलाचा भंडार आहे. भारत, चीन आणि तुर्कीसह जगातील तब्बल 30 देश आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून इंधन खरेदी करतात. पण आज त्याच रशियाला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. रशियामध्ये पेट्रोल पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत असून अलीकडेच खुद्द रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला.
रशियाची ‘मित्र’ भारताकडे साद
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपला देश गंभीर तेल संकटाचा सामना करत असल्याचे मान्य करून कझाकस्तान आणि भारतासारख्या देशांकडून मदत मागितली आहे. भारत आणि चीनसह जगभरातील अनेक देशांना रशिया तेलाचा पुरवठा करत असताना स्वतःलाच ऊर्जा संकटाला सामोरे जावे लागत असून आता युक्रेनच्या आक्रमणामुळे पुतिन यांच्या देशात खळबळ उडाली आहे.
ऊर्जा संकटावर पुतीन काय म्हणाले
गेल्या काही दिवसांतील युक्रेनच्या आक्रमक हल्ल्यानंतर रशिया तेलाच्या संकटाचा सामना करत असल्याचे पुतीन यांनी एका मुलाखतीदरम्यान मान्य केले. युक्रेनसोबत 4 वर्षांतील युद्धादरम्यान झालेल्या वारंवारच्या हल्ल्यांमुळे रशियामध्ये तेल आणि वायूचा तुटवडा निर्माण झाला, असे त्यांनी एका मुलाखतीत कबूल केले. युक्रेनने रशियाच्या तेल आणि गॅस या पायाभूत सुविधांवर वारंवार हल्ले करून रशियाचे मोठे नुकसान केले.
रशिया कोणकोणते प्रदेश ताब्यात घेणार?
त्याचप्रमाणे पुतीन यांनी आपल्या मुलाखतीत डोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसॉन आणि झापोरिझिया हे प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेण्याचे ध्येय बोलून सांगितले. तसेच जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत रशिया आपल्या अटींची पूर्तता न करणारा कोणताही शांतता करार स्वीकारणार नाही. अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर लवकरच वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को शांतता चर्चेत मध्यस्त करण्याची शक्यता आहे.
रशियाची मागणी काय
2022 पासूनच रशिया आणि युक्रेन युद्धभूमीत आमनेसामने उभे ठाकले आहेत. युरोपमधील या युद्धामुळे रशियाच्या तेल आणि रिफायनरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या रशियाने शेजारील कझाकस्तानकडे 50,000 टन पेट्रोलची मागणी केल्याचा रॉयटर्सने दावा केला आहे.
कझाकस्तान द्विधा मनःस्थितीत
पण सध्या कझाकस्तान द्विधा मनःस्थितीत दिसत आहे, कारण कझाकस्तानने रशियाची मदत केल्यास युक्रेनियन ड्रोन त्यांच्या तेल रिफायनरी केंद्रांना लक्ष्य करण्याची भीती आहे. यादरम्यान, कझाकस्तानच्या तेलाच्या निर्यातीचा मोठा भाग रशियन पाइपलाइन आणि बंदरांमार्फत जागतिक बाजारात पोहोचतो. त्यामुळे, रशियाला हो किंवा नाही म्हणण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही.
रशियाला भारताकडून काय मदत हवी?
दुसरीकडे, भारत रशियन तेलाचा प्रमुख खरेदीदार आहे. 2025 मध्ये भारताने रशियाकडून दररोज 15 लाख ते 20 लाख बॅरल तेल खरेदी केलेले, तर जून 2026 मध्ये 26.6 लाख बॅरलपर्यंत तेलाची खरेदी वाढली. या आयातीपैकी काही तेलावर रिफायनरींमध्ये प्रक्रिया करून भारत पुन्हा रशियाला निर्यात करायचा. अशा स्थितीत, देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी रशिया आता भारताकडून पेट्रोलची खरेदी वाढण्याचा विचार करत आहे.
भारत तेल शुद्धीकरणाचे प्रमुख केंद्र
युक्रेनने केलेल्या हल्ल्यामुळे रशियाचे रिफायनरीची ताकद 25 टक्केपर्यंत कमी झाली आहे. शिल्लक रिफायनरी दररोज सुमारे 85000 टन पेट्रोलचे उत्पादन करण्यास सक्षम आहे, जी रशियाची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही. रशियाला दररोज सुमारे 111,000 टन पेट्रोलची गरज असून या स्थितीत, रशिया आता भारतातून पेट्रोल आयात करण्याचा प्रयत्न करत आहे जे जागतिक रिफायनिंगचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते.

