पुणे : देशाच्या राजकारणात सध्या मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. संसदेत हे विधेयक पुन्हा एकदा पटलावर येण्याची शक्यता असून, केंद्रातील मोदी सरकारला एनडीएबाहेरच्या खासदारांचाही पाठिंबा मिळत असल्याने त्यांची स्थिती भक्कम मानली जात आहे. यातच सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि स्वत: शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत सूचक विधान केले आहे. ‘१७ ऑगस्टपर्यंत सर्वांना अनेक घडामोडी बघाव्या लागतील, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल,’ असे मोठे विधान रोहित पवार यांनी केलं आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
मतदानाच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल
डिलिमिटेशन विधेयकाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “संसदेत हे विधेयक आल्यावर कोण कोणाच्या बाजूने उभे राहते आणि कोण गैरहजर राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आमचे खासदार पंतप्रधानांना भेटणार असले, तरी ही भेट केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला दहा दिवस लागतात, पण पंतप्रधानांची वेळ लगेच कशी मिळते? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
“आमचे खासदार विधेयकाच्या विरोधातच राहतील”
आपली भूमिका नेहमीच स्पष्ट असते, असे सांगत रोहित पवार यांनी विश्वास व्यक्त केला की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार या डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधातच मतदान करतील. कोणीही खासदार मतदानाला गैरहजर राहणार नाही. सध्या डिलिमिटेशनच्या नावाखाली अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदारसंघांची मोडतोड करण्याचे काम सुरू आहे. जर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची अशा प्रकारे तोडफोड केली गेली, तर देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवारांवरील टीकेवर सडेतोड प्रतिक्रिया
काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, “विरोधकांच्या टीकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. तुमच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद असताना त्या अधिकारांचा वापर करून धाडसी निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र, पत्रकार परिषदेत त्यांच्याच पक्षाचे नेते स्वतःला पक्षाध्यक्ष समजून वावरतात आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, हे चुकीचे आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पदाचा वापर करत आक्रमक भूमिका मांडावी, अशी अनेकांची अपेक्षा आहे. परंतु, त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांना बोलू देत नाहीत की त्यांचा काही वेगळा प्रोटोकॉल आहे, हे समजत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा