Headlines

Rishabh Pant midnight plea to Uttarakhand CM Pushkar Dhami asks to help in land acquisition to build Home; ऋषभ पंतला मुळांची ओढ! दिल्ली सोडून उत्तराखंडमध्ये पहिलं घर बांधायचंय, जमीन शोधून द्या; मध्यरात्री थेट मुख्यमंत्र्यांना ट्वीट


Rishabh Pant tweet to Pushkar Dhami :आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर ऋषभ पंतला पुन्हा आपल्या मुळांशी जोडून घेत उत्तराखंडसाठी योगदान देण्याची इच्छा आहे. यासाठी त्याने मुख्यमंत्र्यांनाच टॅग करत राज्यात जमीन मिळवून देण्यास मदत करण्याची विनंती केली

Rishabh Pant Pushkar Dhami Maharashtra Times
ऋषभ पंत-पुष्करसिंह धामी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली : टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने शुक्रवारी मध्यरात्री पाऊण वाजता ‘एक्स’ सोशल मीडियावर केलेले ट्वीट लक्ष वेधून घेत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पंतने थेट विनंती केली की, त्याला राज्यात जमीन मिळवून देण्यात मदत करावी, जेणेकरुन तो दिल्लीहून आपला मुक्काम हलवून आपल्या मूळ राज्यात स्वतःचे पहिले घर बांधू शकेल.

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सध्या भारतीय संघासोबत श्रीलंकेत असलेल्या ऋषभने ‘एक्स’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेत एका सविस्तर पोस्टमध्ये पुष्कर सिंह धामी यांना टॅग करत विशेष विनंती केली. मी गेल्या तीन वर्षांपासून उत्तराखंडमध्ये योग्य जमीन शोधण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु माझ्या गरजा पूर्ण करणारी जागा शोधण्यात मला अडचणी येत आहेत, असं तो म्हणाला.

यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर ऋषभ पंतला पुन्हा आपल्या मुळांशी जोडून घेत राज्यासाठी योगदान देण्याची इच्छा आहे.

ऋषभ पंतची लांबलचक पोस्ट

“नमस्कार पुष्कर धामी सर, कसे आहात? उत्तराखंडचा मूळ रहिवासी असूनही मला इथून खूप काळ दूर राहावे लागले आहे. दिल्ली सोडून उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्यासाठी मी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे, पण राहण्याजोगी आणि योग्य आकाराची अशी कोणतीही जागा मला मिळू शकलेली नाही. माझे उत्तराखंडवर खूप प्रेम आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की, जमीन मिळवण्याच्या प्रक्रियेत कृपया मला मदत करावी. सध्या जमिनीच्या व्यवहारांमधील स्पष्टतेचा अभाव आणि इतर गुंतागुंतींमुळे हे काम एखाद्या दुःस्वप्नासारखे झाले आहे. राज्याचा प्रचार-प्रसार करत असताना मला जी जमीन मिळायला हवी होती, ती अजूनही मिळालेली नाही. इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून, मला माझ्या मूळ गावी परत यायचे आहे आणि उत्तराखंडच्या विकासात योगदान द्यायचे आहे; मला माझ्या ‘पहाडी’ बांधवांमध्ये परत राहायचे आहे. कृपया या प्रकरणाकडे लक्ष द्यावे. गेल्या ३ वर्षांपासून मी जमिनीच्या प्रतीक्षेत आहे. आपल्या उत्तराची वाट पाहत आहे सर” असे ऋषभने लिहिलं आहे.

विशेष म्हणजे ऋषभने लगेचच स्पष्ट केलं की, त्याला जमीन मोफत भेट म्हणून नको आहे, तर ती सरकारकडून विहित दराने विकत घ्यायची आहे. “आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करताना एखादी भेट मिळणे नक्कीच छान वाटले असते; पण तुमची परवानगी असल्यास, मला ती जमीन सरकारकडून त्यांच्याच दरांवर विकत घ्यायची आहे. जेणेकरुन मी माझ्या स्वतःच्या राज्यात माझे पहिले घर बांधू शकेन. कृपया राज्याने यात सहकार्य करावे. हे नक्की कसे करायचे, याची मला खरोखरच कल्पना नव्हती” असेही त्यांनी पुढे लिहिले. ऋषभची पोस्ट्स वेगाने व्हायरल झाली आणि त्याच्या अनोख्या विनंतीने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

उत्तराखंडचा सुपुत्र पंत

ऋषभ पंतचा जन्म उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथे झाला. त्याने तिथेच आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर व्यावसायिक स्तरावर खेळण्यासाठी तो दिल्लीला गेला. कालांतराने, क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये भारताच्या प्रमुख यष्टिरक्षक-फलंदाजांपैकी एक म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली.

Maharashtra TimesJohn Turner Retirement : दोन वर्षांपूर्वीच पदार्पण केलेल्या 25 वर्षीय जॉन टर्नरचा क्रिकेटला अलविदा! कठोर निर्णयामागचे कारण काय?ऋषभ जरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करत असला, तरीही उत्तराखंडशी त्याचा घनिष्ठ संबंध कायम आहे. भविष्यात या राज्यातच आपलं घर बांधून विकासात योगदान द्यावे, ही त्याची इच्छा असल्याचं पोस्ट्समधून दिसून येतं.

उत्तराखंडचा सर्वाधिक टॅक्स पेयर

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी उत्तराखंडमधील सर्वाधिक वैयक्तिक इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती म्हणून ऋषभ पंत याचं नाव समोर आलं होतं. त्याने या कालावधीत तब्बल २३.८४ कोटी रुपये प्राप्तिकर भरल्याचे वृत्त आहे. ऋषभचे कर-योगदान मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढल्याचे वृत्त ‘एबीपी लाईव्ह’ने दिले आहे. त्यावर्षी ऋषभने सुमारे १०.५ कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स म्हणून भरले होते.

लखनौ सुपर जायंट्सने ऋषभला २७ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यामुळे तो लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला. ऋषभ हा बीसीसीआय-करारबद्ध ‘ग्रेड ए’ क्रिकेटपटू होता आणि त्याला ५ कोटी रुपयांचे वार्षिक मानधन मिळत होते. त्यानंतर त्याला ‘ग्रेड बी’ मध्ये हलवण्यात आले असून, त्याचे वार्षिक मानधन ३ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

Maharashtra TimesTeam India : खेळाडूंच्या दुखापती की चुकीचं व्यवस्थापन, नेमकी कोणामुळे वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची कामगिरी सातत्याने ढासळतेय?याशिवाय त्याच्या व्यावसायिक कमाईमुळे त्याच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली आहे. ॲडिडास, ड्रीम११, एसजी, थम्स अप, कॅडबरी, बोट, नॉईज, झोमॅटो, जेएसडब्ल्यू सिमेंट आणि मेकमायट्रिप यांसारख्या कंपन्यांसोबत ऋषभचे जाहिरात करार आहेत.