Headlines

rifle shooter damayanti sen found safe after missing for two days ; दोन दिवसांनंतर 15 वर्षीय रायफलपटू दमयंती सेन सुरक्षित सापडली; का सोडलं होतं घर? पालकांची चिंता वाढवणारं कारण समोर


Damayanti Sen News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली 15 वर्षीय रायफलपटू दमयंती सेन अखेर सुरक्षित सापडली. घर सोडण्यामागे नेमकं काय कारण होतं, याबाबत तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

rifle shooter damayanti sen found safe after missing
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पश्चिम बंगालमधील हावड्यातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची राष्ट्रीय स्तरावरील रायफलपटू दमयंती सेन अखेर सुरक्षित सापडली आहे. तिच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबीयांसह हावडा पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. सोशल मीडियावरही तिच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात आली होती. अखेर शनिवारी पहाटे ती हावड्यातील रामकृष्णपूर घाट परिसरात आढळून आली. मात्र, तिने घर सोडण्यामागचं जे कारण पोलिसांना सांगितलं, ते ऐकून क्रीडा क्षेत्रात आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

अभ्यास आणि खेळाचा ताण

प्राथमिक चौकशीत दमयंतीने धक्कादायक खुलासा केला आहे. “अभ्यास आणि रायफल शूटिंग या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना माझ्यावर प्रचंड मानसिक ताण येत होता. याच तणावातून मी घर सोडलं,” असं तिने पोलिसांना सांगितलं. सध्याच्या स्पर्धात्मक युगात अल्पवयीन खेळाडूंवर कामगिरीचं आणि अभ्यासाचं किती दडपण असतं, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Maharashtra TimesR Ashwin : आयुष्याचे 20 वर्षे देशासाठी खेळले, योग्य सन्मान व्हावा; रोहित शर्माच्या निवृत्ती वृत्तांवरुन आर अश्विनने बीसीसीआयला सुनावलं, काय म्हणाला?

अशी सापडली दमयंती

मध्य हावड्यातील उमाशंकर भट्टाचार्य लेन येथे राहणारी दमयंती दोन दिवसांपूर्वी घरातून काही सामान आणण्यासाठी बाहेर पडली होती. जाताना ती तिचा मोबाईलही घरीच विसरली होती. ती परत न आल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी हावडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासादरम्यान ती हावडा रेल्वे स्टेशन, श्रीरामपूर स्टेशन आणि रथयात्रेच्या गर्दीत सीसीटीव्हीत कैद झाली होती. अखेर शनिवारी पहाटे रामकृष्णपूर घाटाजवळ एक मुलगी एकटीच बसल्याचं काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नातेवाईकांनी तिथे धाव घेत तिला सुखरूप घरी आणलं.

वडिलांची पहिली प्रतिक्रिया

“माझी मुलगी सुरक्षित परत आली आहे, हे खरंय. पण सध्या आम्ही पोलीस ठाण्यात आहोत आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने यापेक्षा अधिक काही बोलू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया दमयंतीचे वडील ध्रुवज्योती सेन यांनी दिली.

Maharashtra TimesIND vs ENG 3rd ODI : गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांसोबत बोलत नाहीत? बॅटिंग कोचने सांगितली आतली बातमी

पोलिसांचा तपास सुरू

दमयंती सुरक्षित परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी आणि प्रशिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. घर सोडण्यामागे केवळ अभ्यासाचा ताण होता की आणखी काही कारण? याचा शोध घेण्यासाठी पोलीस तिची आणि कुटुंबीयांची कसून चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासात कोणताही गुन्हेगारी धागा आढळलेला नाही. दरम्यान, या धक्क्यातून सावरण्यासाठी आगामी काळात दमयंतीचे समुपदेशन केले जाण्याची शक्यता आहे.