Headlines

Real estate developer khalil shaikh ended life in pune serious allegations against political leaders; पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये रवींद्र धंगेकरांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली


Crime News: माझ्या पश्चात कुटुंबाला कोणताही त्रास झाल्यास त्याला सर्वस्वी बाळा शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असतील, असा आरोपही खलील शेख यांनी केला आहे.

crime news
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये रवींद्र धंगेकरांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुन्हा एका आत्महत्याच्या घटनेनं पुणे शहर हादरलं आहे. पुण्यातील गुलटेकडी परिसरात एका कंत्राटदाराने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. गुलटेकडी परिसरात वास्तव्यास असलेल्या खलील शेख या विकासकाने गळ्याला फास लावून आपलं जीवन संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे, शेख यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करत त्यामध्ये पुण्यातील अनेक राजकीय नेत्यांची नावं घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत एका बांधकाम प्रकल्पात व्यावसायिक भागीदारी असल्याचंही शेख यांनी नमूद केलं आहे.

आत्महत्येपूर्वी खलील शेख यांनी मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये आपण प्रचंड आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे आणि कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य पुण्यातील लक्ष्मी रोड परिसरातील एका जागेवर इमारतीचे काम करण्यासाठी ‘उत्कर्ष असोसिएट’ नावाची संस्था उभारण्यात आली होती. यात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, सुनील आहेर यांचा मुलगा, हमीद शेख यांचा मुलगा, रघु गौडा आणि स्वतः खलील शेख हे भागीदार होते. या प्रकल्पासाठी बँकांकडून मोठा निधी कर्जरूपाने उचलण्यात आला होता. मात्र, संबंधित जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करत या कामाला स्थगिती देण्यात आली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने बांधकाम पूर्णपणे रखडले आणि पर्यायाने शेख यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला.

खलील शेख यांनी टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या भागीदारांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या आर्थिक अडचणींकडे डोळेझाक केली. उत्कर्ष कंपनीकडून एका मंजूर बिलाचे २० लाख रुपये आणि इतर दोन बिलांचे ३० लाख असे एकूण ५० लाख रुपये येणे बाकी होते. या अडकलेल्या ५० लाख रुपयांवर खलील स्वतः गेल्या तीन वर्षांपासून तब्बल ४ टक्के दराने व्याज भरत होते. बाळा शेडगे यांनी पैसे देण्याऐवजी गुंडगिरीची भाषा वापरली. व्यवसायात अडथळे आणण्याची तसेच पुण्यात जगणे कठीण करण्याची धमकी दिली, असा आरोप शेख यांनी केला आहे.

रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. शेख यांचा मृत्यू वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने झाल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच, संबंधित जागेचा आणि वक्फ बोर्डाचा आता कोणताही कायदेशीर संबंध उरलेला नाही, असा दावाही त्यांनी केला. जेव्हा या प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस आली होती, तेव्हाच आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘अशा चुकीच्या कारवायांमुळे अनेक व्यावसायिक नैराश्यातून आत्महत्या करतील’, असा स्पष्ट इशारा दिला होता, अशी आठवणही धंगेकर यांनी करून दिली. अचानक काम रखडल्यामुळेच हा पूर्ण प्रकल्प कोलमडला आणि सर्वांचे मोठे नुकसान झाले, असे त्यांनी नमूद केले.