महायुती सरकारमध्ये राजकीय सत्तासमीकरणे कितीही जुळली असली, तरी स्थानिक पातळीवरील वर्चस्वाचा संघर्ष शमलेला नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाचा तिढा. एकीकडे रायगड जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचे शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे? असा सवाल विचारला जात असताना, भरत गोगावले आणि तटकरे कुटुंबातील अंतर्गत राजकीय युद्ध पेटलेले पाहायला मिळाले. तर दुसरीकडे नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छुपं युद्ध सुरू आहे. छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यापैकी कोण पालकमंत्री होणार हा प्रश्न तिथेही आहे. गेल्या काही दिवसांत तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झाले आहेत,” अशी राजकीय चर्चा रंगतेय. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी एकिकडे रस्सीखेच सुरु आहे पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा वादावर मात्र तोडगा निघालाय अशी काहीशी चिन्ह आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद नेमका काय आहे? शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने का आल्या? आणि खरंच हा तिढा आता सुटला आहे का? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..